चाळीसगाव (प्रतिनिधी) तालुक्यातील मांदुरने येथील रहिवाशी व येथील आर्ट्स, सायन्स अँड कॉमर्स कॉलेजात १२ वीत शिकणाऱ्या कु. हर्षदा प्रताप पाटील, या विद्यार्थिनीला शहरातील लक्ष्मीनगर येथे क्लासकरिता आली असता अचानक चक्कर येवून ती कोसळली होती. त्यावेळी प्रा. अश्विनी वानखेडकर यांनी विद्यार्थ्यांच्या मदतीने ताबडतोब डॉ. सुनील राजपूत यांच्या दवाखान्यात आणले. तिथे डॉ. राजपूत यांनी तत्काळ तिच्यावर उपचार सुरू केले. सदर मुलीकडे मेडिकलवरून औषधे आणायलाही पैसे नव्हते, डॉक्टरांनी परिस्थितीचे गांभीर्य ओळखून त्यांना धीर दिला व स्वतःच औषधोपचार केलेत. त्यानंतर उपचारांना यश येवून दोन तासांनी विद्यार्थिनी शुद्धीवर आली आणि सर्वांनी सुटकेचा नि:श्वास सोडला.
डॉ. राजपूत यांनी विलंब न लावता उपचार केल्यामुळेच मुलीचे प्राण वाचल्याची भावना उपस्थितांमधून व्यक्त होत होती. सर्व उपचार झाल्यानंतर त्यांनी कुठलीही फी घेतली नाही. सर्वाना आरोग्याची काळजी घेण्याबाबत सूचनाही दिल्या. सर्व विद्यार्थी व प्रा. वानखेडकर यांनी डॉक्टरांचे आभार मानले. सदर विद्यार्थिनी संपूर्ण बरी झाल्यानंतर आज पुन्हा ती वडिल प्रताप विक्रम पाटील व आई सौ. प्रतिभा पाटील यांच्यासह डॉ. राजपूत यांना भेटण्यासाठी आली होती. त्यावेळी सर्व विद्यार्थी, प्रा. वानखेडकर यांनी डॉ. राजपूत यांचा शाल, श्रीफळ व पुष्पहार देऊन सत्कार केला व आपली कृतज्ञता व्यक्त केली.
यावेळी डॉ. सुनील राजपूत यांचे मित्र डॉ. संतोष मालपुरे तसेच प्रेरणा पाटील, वैशाली चव्हाण, जयश्री पाटील, मानसी परदेशी, राणी राठोड, पल्लवी आगोने, प्रतिज्ञा चव्हाण, पूजा जाधव, निलेश लक्षुमन, भुवनेश्वर रोकडे, उद्धव कदम, उमेश राठोड, मिलिंद गायकवाड, ईश्वर गायकवाड, लहू राठोड, विशाल देसले, श्रीकांत बिलोरे, विकास खैरनार, अतिष केदार आदी विद्यार्थी उपस्थित होते.