अमळनेर-लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी । अमळनेर नगरपरिषद निवडणुकीची घोषणा होताच शहरातील राजकीय वातावरण अचानक तापले असून विविध उमेदवारांकडून प्रचार मोहीम जोमात सुरू झाली आहे. याच पार्श्वभूमीवर शिवसेना (शिंदे गट) पक्षाने अधिकृत ‘धनुष्यबाण’ चिन्हावर डॉ. परीक्षित श्रीराम बाविस्कर यांना उमेदवारी देत राजकारणात एक तगडे नवे आव्हान निर्माण केले आहे. उच्चशिक्षित, निष्कलंक प्रतिमा आणि समाजकार्यातील सक्रियता यामुळे डॉ. बाविस्कर यांच्या उमेदवारीकडे शहरातील मतदारांनी विशेष उत्सुकतेने पाहायला सुरुवात केली आहे.

डॉ. परीक्षित बाविस्कर हे धुळे येथील शासकीय हिरे वैद्यकीय महाविद्यालयातून एम.बी.बी.एस. करताना वैद्यकीय क्षेत्रात योग्य अनुभव घेऊन पुढे एम.डी. नायर हॉस्पिटल, तसेच हिंदुजा हॉस्पिटल मुंबई येथे अतिदक्षता विभागात तज्ज्ञ म्हणून काम करत होते. त्यानंतर प्रा. आरोग्य केंद्र, मारवड येथे वैद्यकीय अधिकारी म्हणून सेवा देत त्यांनी ग्रामीण भागातील आरोग्य समस्यांशी जवळून सामना केला. वैद्यकीय कर्तव्य बजावत असताना त्यांनी रुग्णांमध्ये लोकाभिमुख सेवाभावाची छाप पाडली.

राजकीय क्षेत्रात त्यांना कौटुंबिक वारसा लाभलेला असून त्यांच्या काकू लक्ष्मीबाई प्रल्हाद बाविस्कर या 2000 ते 2005 या काळात नगरसेविका म्हणून अमळनेर नगरपरिषदेत सक्रियपणे कार्यरत होत्या. त्यांचे बालपण, शिक्षण आणि कौटुंबिक नाळ अमळनेरशी घट्ट जोडलेली असल्याने शहरातील मतदारांमध्ये त्यांची चांगली ओळख आहे.
डॉ. बाविस्कर यांनी आतापर्यंत अनेक सामाजिक उपक्रमांमध्ये सक्रिय सहभाग घेतला आहे. जिल्हा पत्रकार संघाच्या माध्यमातून पत्रकारांसाठी मोफत आरोग्य तपासणी शिबिरे, हमाल, मापाडी, मजूर आणि इतर श्रमिक वर्गासाठी मोफत आरोग्य सेवा, वनवासी जनकल्याण समितीमार्फत आदिवासी वाड्यांमध्ये औषधोपचार आणि मार्गदर्शन अशा विविध उपक्रमांनी त्यांनी समाजकार्यात मोलाचे योगदान दिले आहे.
नगरपरिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर डॉ. बाविस्कर यांनी शहरातील विकासाला गती देण्याचा निर्धार व्यक्त केला आहे. राज्याचे उपमुख्यमंत्री आणि शिवसेनेचे प्रमुख नेते एकनाथ शिंदे यांच्या नगरविकास खात्याचा लाभ, तसेच जिल्ह्याचे पालकमंत्री आणि पाणीपुरवठा मंत्री गुलाबराव पाटील यांचे मार्गदर्शन यातून अमळनेर शहराचा चेहरामोहरा बदलण्याचे मोठे काम हाती घेण्यात येईल, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला. माजी आमदार शिरीष चौधरी यांच्या नेतृत्वात शहरात नवे प्रकल्प आणि मूलभूत सुविधा वाढवण्याच्या योजनांना गती मिळेल, असे ते म्हणाले.



