अमळनेर-लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी । अमळनेर नगरपरिषदेच्या सार्वत्रिक निवडणुकीत मतदारांनी दिलेल्या कौलामुळे शहराच्या राजकारणात मोठी उलथापालथ झाली असून, शिवसेना (शिंदे गट) चे उमेदवार डॉ. परीक्षित बाविस्कर यांनी लोकनियुक्त नगराध्यक्षपदी दणदणीत विजय मिळवला आहे. त्यांनी शहर विकास आघाडीचे उमेदवार जितेंद्र ठाकूर यांचा तब्बल ८ हजार ६६५ मतांनी पराभव करत सत्तेची सूत्रे आपल्या हाती घेतली आहेत.
नगराध्यक्ष पदाच्या थेट निवडणुकीत डॉ. परीक्षित बाविस्कर यांना ३० हजार ८५६ मते मिळाली, तर जितेंद्र ठाकूर यांना २२ हजार २०८ मते मिळाली. या निवडणुकीत एकूण ५७ हजार ९६० मतदान झाले होते. आमदार शिरीष चौधरी यांनी शिवसेनेत प्रवेश केल्यानंतर अमळनेरच्या राजकारणात मोठी घडामोड घडली असून, या निकालामुळे विद्यमान आमदार अनिल पाटील यांना राजकीय धक्का बसल्याचे बोलले जात आहे.
नगरसेवक पदांच्या निकालांकडे पाहता अमळनेरात अपक्ष उमेदवारांनी मोठी मुसंडी मारली आहे. तब्बल १२ अपक्ष उमेदवार विजयी झाले असून, शहर विकास आघाडीला १२ जागा मिळाल्या आहेत. शिवसेनेला १० जागांवर समाधान मानावे लागले असून, शिवसेना पुरस्कृत शिरीष चौधरी मित्र परिवार आघाडीला २ जागा, तर राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) ला केवळ १ जागा मिळाली आहे. नगराध्यक्ष शिवसेनेचा असला तरी संख्याबळाच्या दृष्टीने अपक्ष नगरसेवक निर्णायक ठरण्याची शक्यता राजकीय वर्तुळात व्यक्त केली जात आहे.
प्रभागनिहाय निकालांमध्ये अनेक ठिकाणी चुरशीच्या लढती पाहायला मिळाल्या. शहर विकास आघाडी, शिवसेना आणि अपक्ष उमेदवारांमध्ये थेट सामना झाला. काही प्रभागांमध्ये अत्यल्प मतांनी निकाल लागले, तर काही ठिकाणी स्पष्ट मताधिक्य दिसून आले. प्रभाग क्रमांक ८-अ मध्ये शहर विकास आघाडीचे सचिन बळवंत पाटील बिनविरोध निवडून आले, ही निवडणुकीतील महत्त्वाची बाब ठरली.
या निवडणुकीत अनेक प्रस्थापित आणि अनुभवी लोकप्रतिनिधींना मतदारांनी नाकारले. आमदार अनिल पाटील यांच्या निकटवर्तीय मानले जाणारे माजी नगरसेवक नरेंद्र चौधरी, विनोद कदम, पत्रकार चेतन राजपूत, रेखा संजय पाटील, प्रताप शिंपी, अनिता लांबोळे, हेमंत पवार, माजी उपनगराध्यक्षा सबनूरबी सलीम शेख, इम्रान खाटीक, मनोज पाटील, माजी नगरसेविका अॅड. चेतना पाटील, प्रताप साळी, राजेश पाटील, विद्या भदाणे यांचा पराभव झाला. तसेच माजी आमदार शिरीष चौधरी गटातील प्रवीण पाठक, उज्वला महाजन आणि सुनील भामरे यांनाही पराभव स्वीकारावा लागला.
विजयानंतर प्रतिक्रिया देताना लोकनियुक्त नगराध्यक्ष डॉ. परीक्षित बाविस्कर यांनी अमळनेरच्या जनतेचे आभार मानत, “जनतेने माझ्यावर जो विश्वास टाकला आहे, तो मी प्रामाणिकपणे पेलण्याचा प्रयत्न करेन. अमळनेर शहराचा सर्वांगीण विकास करून जनतेच्या या उपकारांची उतराई करण्याचा माझा संकल्प आहे,” असे सांगितले.
दरम्यान, पराभूत उमेदवार जितेंद्र ठाकूर यांनीही जनतेचा कौल नम्रतेने स्वीकारत निवडणूक ही लोकशाहीची खरी ताकद असल्याचे नमूद केले. त्यांनी या निवडणुकीत साथ दिलेल्या सर्व नेते, पदाधिकारी, कार्यकर्ते आणि मतदारांचे आभार व्यक्त केले.
थोडक्यात, अमळनेर नगरपरिषद निवडणुकीत डॉ. परीक्षित बाविस्कर यांच्या विजयासह अपक्ष उमेदवारांच्या भक्कम कामगिरीमुळे शहराच्या राजकारणात नवे समीकरण उदयास आले असून, आगामी काळात नगरपरिषदेतील सत्ताकारण अधिक रोचक होणार असल्याचे स्पष्ट झाले आहे.



