एरंडोल-लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी । एरंडोल शहराच्या विकासासाठी मोठा निधी उपलब्ध करून देण्याची ग्वाही देत आमदार अमोल चिमणराव पाटील यांनी शुक्रवारी झालेल्या प्रचारसभेत शहरवासीयांमध्ये नवचैतन्य निर्माण केले. रस्त्यांसाठी दीडशे कोटींचा निधी तत्काळ उपलब्ध करून देण्याचे आश्वासन देताना त्यांनी महापुरुषांच्या पुतळ्यांचे सुशोभीकरण करण्यासाठी लागेल तितका निधी देण्याची तयारी दर्शवली.

सभेत बोलताना आमदार पाटील म्हणाले की, “अपक्ष उमेदवार विकासासाठी आवश्यक निधी कुठून आणतील? निधीशिवाय शहराचा विकास होऊ शकत नाही. त्यामुळे सत्ताधारी पक्षाच्या उमेदवारांना निवडून दिल्यास गावाचा विकास नक्कीच होईल.” त्यांच्या भाषणाला उपस्थित नागरिकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला.

यानंतर डॉ. नरेंद्र ठाकूर यांनी प्रभावी शब्दांत जनतेसमोर आपली भूमिका मांडली. “मी उच्चशिक्षित उमेदवार आहे. गावाचा सर्वांगीण विकास करण्याची क्षमता माझ्यात आहे. मी हात जोडणारा नाही, परंतु अडीनडीला हातात हात घेणारा उमेदवार आहे. मला भरघोस मतांनी निवडून द्या,” असे आवाहन त्यांनी केले.
या सभेला जळगाव जिल्हा भाजप अध्यक्ष राधेश्याम चौधरी, भाजपचे राजू पाटील, डॉ. एन. डी. पाटील, एस. आर. पाटील, शिवसेनेचे संजय महाजन, संदीप पाटील, बबलू पाटील, शालिक गायकवाड, नरेश ठाकरे, योगेश महाजन, रुपेश महाजन, समाधान पाटील, कुणाल महाजन, अनिल महाजन, राजू महाजन तसेच ज्येष्ठ नेते रमेश अण्णा महाजन यांच्यासह अनेक मान्यवरांची उपस्थिती लाभली. त्यांच्या उपस्थितीमुळे प्रचारसभेला औचित्य प्राप्त झाले.
सभेच्या शेवटी नागरिकांमध्ये विकासाविषयी आशावाद निर्माण झाल्याचे चित्र दिसून आले. उमेदवारांनी दिलेली आश्वासने आणि पक्षनेत्यांची बांधिलकी यामुळे निवडणूक वातावरण अधिक रंगतदार होत असल्याची चर्चा शहरात सुरू झाली आहे.



