Home आरोग्य  डॉ. नागूलकर दाम्पत्याचे संशोधन व नेतृत्त्व क्षेत्रात द्विगुणित यश

 डॉ. नागूलकर दाम्पत्याचे संशोधन व नेतृत्त्व क्षेत्रात द्विगुणित यश


जळगाव – लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी । नाशिक येथे नुकत्याच पार पडलेल्या HEAL-2025 (Health Education for Adaptive Learning) या बहुविद्याशाखीय राष्ट्रीय परिषदेत जळगावच्या डॉ. कल्याणी नागूलकर आणि डॉ. जयवंत नागूलकर या डॉक्टर दाम्पत्याने आपल्या कार्यकौशल्याने प्रेक्षक व आयोजकांची दाद मिळवली. संशोधन पेपर सादरीकरणात डॉ. कल्याणी नागूलकर यांना द्वितीय क्रमांक मिळाला, तर डॉ. जयवंत नागूलकर यांना ‘Exemplary Leadership Award’ या विशेष पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.

ही परिषद मराठा विद्या प्रसारक समाजाच्या फिजिओथेरपी कॉलेज, नाशिकद्वारे २६ व २७ सप्टेंबर २०२५ रोजी आयोजित करण्यात आली होती. महाराष्ट्रातील सुमारे २०० हून अधिक फिजिओथेरपिस्टसचा या परिषदेत सहभाग होता. डॉ. कल्याणी नागूलकर या जळगावमधील जैन डिव्हाईन पार्कच्या निरामय नॅचरोपॅथी सेंटरच्या प्रमुख असून, त्यांनी “Meta Analysis on Hand Rehabilitation: Usage and Effectiveness Based on Research from 2020-2025” या विषयावर सखोल आणि वैज्ञानिक दृष्टिकोनातून सादरीकरण केले. वरिष्ठ गटातील या स्पर्धेत त्यांना द्वितीय क्रमांक मिळाला.

दुसरीकडे, उल्हास पाटील मेडिकल कॉलेज फिजिओथेरपी विभागाचे प्राचार्य डॉ. जयवंत नागूलकर यांना फिजिओथेरपी क्षेत्रात केलेल्या नेतृत्वगुणांच्या कामगिरीसाठी ‘Exemplary Leadership Award’ प्रदान करण्यात आला. त्यांच्या नावावर आजवर शैक्षणिक, प्रशासकीय आणि समाजोपयोगी क्षेत्रात अनेक उल्लेखनीय कामगिरी जमा झाली आहे.

या पुरस्कार वितरण सोहळ्याला महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठाचे प्र-कुलगुरू डॉ. मिलिंद निकुंभ, अ‍ॅड. नितीन ठाकरे, डॉ. सुदीप काळे, डॉ. अमृत कौर यांच्यासह विविध क्षेत्रातील मान्यवरांची उपस्थिती होती. या सन्मानानंतर जैन इरिगेशनचे अध्यक्ष अशोक जैन यांनी डॉक्टर दाम्पत्याचे कौतुक करत त्यांचे अभिनंदन केले.

HEAL-2025 परिषद ही आरोग्यसेवा शिक्षणातील नवोपक्रम, संशोधन व नवकल्पनांना प्रोत्साहन देणारे व्यासपीठ म्हणून ओळखली जाते. विविध विषयांवर तज्ज्ञ, संशोधक व विद्यार्थी यांनी आपले ज्ञान व अनुभव या मंचावर शेअर केले. यामध्ये नागूलकर दाम्पत्याने केलेली कामगिरी आरोग्यसेवा क्षेत्रातील नव्या विचारांना चालना देणारी ठरली.

या यशामुळे डॉ. जयवंत व डॉ. कल्याणी नागूलकर यांच्यावर जळगाव परिसरातून कौतुकाचा वर्षाव होत असून, त्यांच्या पुढील वाटचालीसाठी शुभेच्छांची रेलचेल सुरू आहे.


Protected Content

Play sound