जळगाव – लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी । सामाजिक बांधिलकी, शिक्षण व महिला सक्षमीकरण क्षेत्रात अत्यंत सकारात्मक आणि प्रेरणादायी कार्य करणाऱ्या डॉ. केतकी पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त गोदावरी फाउंडेशन परिवारात उत्सवाचे आणि गौरवाचे वातावरण होते. या प्रसंगी माजी खासदार आणि गोदावरी फाउंडेशनचे अध्यक्ष डॉ. उल्हास पाटील यांनी विश्वास व्यक्त केला की, “डॉ. केतकी पाटील यांच्या कार्याची लवकरच देश पातळीवर दखल घेतली जाईल.”
गोदावरी अभियांत्रिकी व तंत्रनिकेतन महाविद्यालयात आयोजित या कार्यक्रमात डॉ. केतकी पाटील यांच्या कार्याचा गौरव करण्यात आला. शिक्षण क्षेत्रातील त्यांचे योगदान, नवोन्मेषी उपक्रम, तसेच समाजाभिमुख दृष्टिकोन या सर्व बाबींचा नम्रपणे आणि प्रभावीपणे गौरव करत फाउंडेशन परिवाराने त्यांना शुभेच्छांचा वर्षाव केला. यावेळी त्यांचे स्वागत औक्षण, पुष्पगुच्छ आणि सन्मानाने करण्यात आले. त्यांच्या जीवनप्रवासावर आधारित परिचयात्मक चित्रफीतही याप्रसंगी सादर करण्यात आली.

या सोहळ्यात प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित असलेले डॉ. उल्हास पाटील आणि सचिव डॉ. वर्षा पाटील यांनी डॉ. केतकी पाटील यांचे सामाजिक कार्य, नेतृत्वक्षमता आणि संवेदनशील दृष्टिकोनाचे कौतुक करत त्यांच्याबद्दल कृतज्ञता व्यक्त केली. त्यांच्या कार्याने शिक्षणसंस्था ही समाज परिवर्तनाची कार्यशाळा ठरते, हे त्यांनी आपल्या कृतीतून दाखवून दिले असल्याचे गौरवोद्गार यावेळी काढण्यात आले.
कार्यक्रमात गोदावरी फाउंडेशनच्या विविध संस्थांचे प्राचार्य, समन्वयक आणि अध्यापक उपस्थित होते. डॉ. विजयकुमार पाटील, डॉ. प्रशांत वारके, सौ. निलिमा चौधरी, डॉ. निलिमा वारके, डॉ. कविता देशमुख, डॉ. नयना झोपे, प्रा. दीपक झांबरे, प्रा. हेमराज धांडे, प्रा. नकुल गाडगे आदींनी आपले मनोगत व्यक्त करत डॉ. पाटील यांच्या कार्यपद्धतीचे कौतुक केले. विद्यार्थिनी चेतना सोनवणे हिने सादर केलेल्या भावस्पर्शी गीताने वातावरण भारावून गेले.
डॉ. केतकी पाटील यांनी आपल्या आभारप्रद भाषणात सांगितले की, “गोदावरी फाउंडेशन केवळ शैक्षणिक संस्था नसून समाज घडवण्याचे माध्यम आहे. शिक्षण, आरोग्य आणि महिला सक्षमीकरण हे आमचे मूलभूत मूल्य असून, या कार्यात सर्वांचा सहभाग अनिवार्य आहे.” त्यांच्या शब्दांनी उपस्थितांना नवचैतन्य आणि प्रेरणा मिळाली.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन खुशाली बेलदार यांनी केले. संपूर्ण आयोजन आणि समन्वय प्रा. हेमराज धांडे आणि प्रा. नकुल गाडगे यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडले. फाउंडेशनच्या सर्व प्राध्यापक, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी परिश्रम घेतले.
डॉ. केतकी पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त साजरा झालेला हा कार्यक्रम केवळ एक औपचारिक सोहळा न राहता, समाजसेवेच्या दिशेने झेप घेणाऱ्या कार्याची प्रेरणादायी कहाणी ठरली. त्यांच्या दूरदृष्टीच्या आणि सामाजिक योगदानाच्या कार्याचा गौरव हा भावी पिढीसाठी एक मार्गदर्शन ठरेल, यात शंका नाही.



