जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । डॉ. उल्हास पाटील वैद्यकीय महाविद्यालयात छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमीत्त फिजीओथेरेपी, एमबीबीएस, आयुर्वेद आणि नर्सिंग महाविद्यालयातर्फे विविध कार्यक्रमांच्या माध्यमातून शिवभक्तीचा जागर करण्यात आला. यावेळी महाविद्यालय परिसरातून छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेची काढण्यात आलेली पालखी शोभायात्रा आणि अफजल खानाचा वध हे प्रमुख आकर्षण ठरले.
छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती डॉ. उल्हास पाटील वैद्यकीय महाविद्यालयात मोठ्या जल्लोषात साजरी करण्यात आली. डॉ. उल्हास पाटील कॉलेज ऑफ फिजीओथेरेपी महाविद्यालयातर्फे डॉ. केतकी पाटील सभागृहात छत्रपती शिवाजी महाराज यांची वैद्यकीय महाविद्यालयाचे अधीष्ठाता डॉ. प्रशांत सोळंके यांच्या हस्ते महाआरती करण्यात आली. यावेळी फिजीओथेरेपी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. जयवंत नागूलकर, रजीस्ट्रार राहुल गिरी यांच्यासह प्राध्यापक उपस्थित होते. याप्रसंगी सांस्कृतिक कार्यक्रम देखिल सादर करण्यात आले. डॉ. गुणवंतराव सरोदे आयुर्वेद महाविद्यालयातर्फे शिवजयंतीनिमीत्त अफजल खान वधाचा प्रसंग साकारण्यात आला. यावेळी प्रख्यात हृदयरोग तज्ञ डॉ. वैभव पाटील, आयुर्वेद महाविद्यालयाचे डीन डॉ. हर्षल बोरोले, वैद्यकीय रूग्णालयाचे अधीक्षक डॉ. प्रेमचंद पंडीत, कृषी महाविद्यालयाचे प्रा. पूनमचंद सपकाळे, रजीस्ट्रार चेतन पाटील यांच्यासह प्राध्यापक उपस्थित होते.
एबीबीएसतर्फे शिवरायांचा पालखी सोहळा
डॉ. उल्हास पाटील वैद्यकीय महाविद्यालयातर्फे शिवजयंतीनिमीत्त छत्रपती शिवरायांची पालखी शोभायात्रा काढली. टाळ, मृदुंगाच्या गजरात आणि ढोल-ताशांच्या दणदणाटात या शोभायात्रेने जणू काही महाविद्यालयात शिवशाही अवतरल्याची प्रचिती आली. याप्रसंगी वैद्यकीय महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी छत्रपती शिवरायांचा दरबाराचा देखावा सादर केला. यावेळी महाविद्यालयाचे डीन डॉ. प्रशांत सोळंके, डॉ. सुहास बोरले, डॉ. एन.एस. आर्विकर, हृदयरोग तज्ञ डॉ. वैभव पाटील, रजीस्ट्रार प्रमोद भिरूड, वैद्यकीय अधीक्षक डॉ. प्रेमचंद पंडीत आदींसह मान्यवर उपस्थित होते.