Home Cities जळगाव टोकियो येथील ‘WFVS’ फेलोशिपसाठी डॉ. अमित राणे यांची निवड 

टोकियो येथील ‘WFVS’ फेलोशिपसाठी डॉ. अमित राणे यांची निवड 


जळगाव-लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी । पुण्यातील प्रख्यात रक्तवाहिन्या शल्यचिकित्सक डॉ. अमित राणे यांची जपानमधील टोकियो येथील नामांकित Jikei University मध्ये प्रतिष्ठित ‘WFVS’ फेलोशिप प्रोग्रामसाठी निवड झाली आहे. जागतिक स्तरावर अत्यंत मानाची समजली जाणारी ही फेलोशिप मिळवणारे ते मोजक्या तज्ज्ञांपैकी एक ठरले आहेत. त्यांच्या या निवडीमुळे वैद्यकीय क्षेत्रात आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे.

वर्ल्ड फेडरेशन ऑफ व्हॅस्क्युलर सोसायटीज (WFVS) या आंतरराष्ट्रीय संस्थेच्या वतीने ही फेलोशिप प्रदान करण्यात येते. रक्तवाहिन्यांशी संबंधित आजारांवरील प्रगत संशोधन, आधुनिक तंत्रज्ञान आणि अत्याधुनिक शस्त्रक्रिया पद्धतींचा सखोल अभ्यास करण्याची संधी या फेलोशिपद्वारे मिळते. जगभरातील निवडक आणि गुणवंत तज्ज्ञांचीच या कार्यक्रमासाठी निवड केली जाते.

जपानमधील ख्यातनाम तज्ज्ञ Prof. Oki यांच्या मार्गदर्शनाखाली डॉ. राणे हे रक्तवाहिन्यांशी संबंधित प्रगत शस्त्रक्रिया आणि उपचार पद्धतींचे प्रशिक्षण घेणार आहेत. ३ ते ६ महिने कालावधीच्या या विशेष प्रशिक्षण कार्यक्रमासाठी जिकेई युनिव्हर्सिटीच्या रक्तवाहिन्या शस्त्रक्रिया विभागातील Dr. Hirotsugu Ozawa यांनी त्यांना अधिकृत निमंत्रण पाठवले आहे. या कालावधीत ते अत्याधुनिक उपकरणे, नव्या संशोधन पद्धती आणि जटिल शस्त्रक्रियांचे बारकावे आत्मसात करणार आहेत.

या फेलोशिपमुळे डॉ. राणे यांना आंतरराष्ट्रीय दर्जाच्या वैद्यकीय सुविधा आणि संशोधनाचा प्रत्यक्ष अनुभव मिळणार असून, त्याचा थेट लाभ महाराष्ट्रातील रुग्णांना होणार आहे. विशेषतः रक्तवाहिन्यांच्या आजारांवरील उपचार अधिक प्रभावी आणि आधुनिक पद्धतीने उपलब्ध होण्यास मदत होईल, असा विश्वास व्यक्त केला जात आहे.

या उल्लेखनीय यशाबद्दल गोदावरी फाउंडेशनचे अध्यक्ष Dr. Ulhas Patil यांनी डॉ. राणे यांचे कौतुक केले आहे. त्यांच्या भावी वाटचालीसाठी शुभेच्छा देताना त्यांनी ही निवड जळगाव जिल्ह्यासह राज्यासाठी अभिमानाची बाब असल्याचे सांगितले. वैद्यकीय तसेच विविध क्षेत्रांतून डॉ. अमित राणे यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.


Protected Content

Play sound