भुसावळ-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | आज रात्री झालेल्या गोळीबारात माजी नगरसेवक संतोष बारसे आणि सामाजिक कार्यकर्ते सुनील राखुंडे यांचा मृत्यू झाल्याने परिसरात एकच खळबळ उडाली आहे.
गेल्या अनेक दिवसांपासून गुन्हेगारी क्षेत्रात शांतता राहिल्यानंतर आज पुन्हा एकदा भुसावळ गोळीबाराने हादरले असून यात दोघांचा बळी गेल्याने पुन्हा एकदा कायदा आणि सुव्यवस्थेची स्थिती चिंतेचा विषय बनलेली आहे.
आज रात्री साडेनऊच्या सुमारास भुसावळ शहरात गोळीबार झाला. यात सामाजिक कार्यकर्ते तथा माजी नगरसेवक संतोष बारसे तसेच सामाजिक कार्यकर्ते सुनील राखुंडे हे गंभीर जखमी झाले. ही घटना शहरातील जुना सातारा परिसरातील मरिमाता मंदिर परिसरात घडली. प्राप्त माहितीनुसार हे दोन्ही जण चारचाकीतून राष्ट्रीय महामार्गाकडून जुना सातारा मार्गाने शहरात येत असतांना हल्लेखोरांनी त्यांना अडवून गोळीबार करून पलायन केले.
याबाबतची माहिती मिळताच परिसरातील नागरिकांनी या दोघांना पहिल्यांदा ट्रॉमा केअर सेंटरमध्ये आणि नंतर शहरातील खासगी रूग्णालयात दाखल केले. तेथे डॉक्टरांनी त्यांना मृत घोषीत केले.
संतोष बारसे हे माजी नगरसेवक असून त्यांच्या सौभाग्यवती सोनी बारसे यांनी आधी उपनगराध्यक्षपद भूषविले आहे. त्यांचे वडील मोहन बारसे यांचा देखील आधी खून झाला होता. यानंतर आता संतोष बारसे यांच्यावर गोळीबार करण्यात आला असून यात त्यांचा दु:खद अंत झाला आहे.
सुनील राखुंडे हे देखील अवघ्या काही वर्षांमध्ये भुसावळमध्ये अचानक चर्चेत आले होते. अल्प काळात त्यांनी सामाजिक कार्यात नाव मिळवले होते. आगामी काळात ते राजकीय क्षेत्रात प्रवेश करणार असल्याच्या चर्चा देखील अधून-मधून होत होत्या. मात्र आज झालेल्या गोळीबारात त्यांचा बळी गेला आहे.
दरम्यान, संतोष बारसे आणि सुनील राखुंडे यांच्यावर गोळीबार झाल्याची माहिती मिळताच त्यांच्या समर्थकांनी तात्काल घटनास्थळी धाव घेतली. यानंतर समर्थक मोठ्या संख्येने रूग्णालयात दाखल झाले आहेत. पोलीस अधिक्षक एम. महेश्वर रेड्डी, अपर पोलीस अधिक्षक अशोक नखाते, डीवायएसपी कृष्णांत पिंगळे, पोलीस निरिक्षक गजानन पडघन यांनी तात्काळ घटनास्थळाला भेट देऊन माहिती जाणून घेतली. कोणताही अनुचित प्रकार होऊ नये म्हणून पोलिसांनी शहरात कडेकोट बंदोबस्त लावला आहे.