सिंधुदुर्ग (वृत्तसंस्था) कोहिनूर मिल आर्थिक व्यवहार प्रकरणी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची ईडीकडून सध्या चौकशी सुरु आहे. या चौकशीतून काही निष्पन्न होणार नाही, असे काल उद्धव ठाकरे यांनी म्हटले होते. आता राज्याचे गृहराज्यमंत्री दीपक केसरकर यांनीही ईडीची चौकशी झाली म्हणजे अटक होईलच असे नाही, असे वक्तव्य केले आहे.
मागचा इतिहास पाहता, पूर्वी ज्यांची ज्यांची चौकशी झाली त्या सर्वांना अटक झालेली दिसत नाही, असे सांगत केसरकर यांनी उद्धव ठाकरे यांच्या वक्तव्याचाही दाखला दिला. दिल्लीत जो प्रकार घडला तो महाराष्ट्रात होणार नाही. महाराष्ट्राची एक वेगळी संस्कृती आहे. राज ठाकरे यांनी ईडीची चौकशी संयमाने घेतली आहे. त्यांनी या चौकशीसाठी सहकार्य केले आहे. इतकेच नाही, तर त्यांनी आपल्या कार्यकर्त्यांना शांतात पाळण्याचेही आवाहन केले आहे, असे म्हणत गृहराज्यमंत्री केसरकर यांनीही सर्वांना शांतता पाळण्याचे आवाहन केले. काल दिल्लीत जो प्रकार झाला तो महाराष्ट्रात होणार नाही. महाराष्ट्राची एक वेगळी संस्कृती आहे. ईडी चौकशीला राज ठाकरे यांनीही संयमाने घेतलं आणि सहकार्य केले आहे. कार्यकर्त्यांनाही शांत राहण्याचं आवाहन त्यांनी केले. तसेच मी देखील सर्वांना शांत राहण्याचे आवाहन करतो, असे केसरकर म्हणाले.