मुंबई-वृत्तसेवा | माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या बारामती येथील विमान अपघातातील मृत्यूबाबत कोणतीही “पतंगबाजी” किंवा हवेत गोळीबार करू नये, असे स्पष्ट आवाहन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले आहे. हा अत्यंत संवेदनशील विषय असून मृत व्यक्तीच्या पद-प्रतिष्ठेचा तसेच त्यांच्या कुटुंबीयांच्या मानमरातबाचा विचार करणे आवश्यक आहे, असे त्यांनी म्हटले.
गत २८ जानेवारी रोजी बारामती येथे झालेल्या विमान दुर्घटनेत अजित पवार यांचे निधन झाले. त्यानंतर सत्ताधारी राष्ट्रवादी काँग्रेस आणि विरोधी बाकावरील शरद पवार गटांच्या काही आमदारांनी हा अपघात नसून घातपात असल्याचा आरोप केला आहे. विशेषतः आमदार रोहित पवार यांनी काही पुरावे सादर करत दुर्घटनेमागे घातपाताचा संशय व्यक्त केला आहे.

एका वृत्तवाहिनीच्या कार्यक्रमात बोलताना मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले की, “रोहित पवार यांनी माझी भेट घेऊन काही मुद्दे मांडले. त्यांनी दिलेल्या पत्राला माझे पत्र जोडून डीजीसीएकडे या घटनेची सखोल चौकशी करण्याची मागणी करणार आहे. मात्र अशा घटना घडतात तेव्हा कोणतीही अटकळ किंवा हवेत गोळीबार टाळावा. हा अत्यंत संवेदनशील मुद्दा आहे.”
दुर्दैवाने मृत व्यक्ती स्वतः बाजू मांडू शकत नाही, त्यामुळे त्यांच्या पदाचा आणि प्रतिष्ठेचा आदर राखणे गरजेचे आहे. विशेषतः कुटुंबीयांच्या भावनांचा विचार केला पाहिजे, असेही त्यांनी नमूद केले. या विषयावर अधिक भाष्य करण्यास त्यांनी नकार दिला.
दरम्यान, राष्ट्रवादी काँग्रेसच्या विलिनीकरणाच्या चर्चांवर आणि Sunetra Pawar यांच्या उपमुख्यमंत्रीपदाच्या शपथविधीबाबत झालेल्या कथित घाईवरही मुख्यमंत्री फडणवीस यांनी भूमिका स्पष्ट केली. “सुनेत्रा पवार यांना उपमुख्यमंत्री करण्याचा निर्णय हा आमचा नव्हे, तर राष्ट्रवादी काँग्रेसचा होता. त्यांनी कागदपत्रांसह तारीख दिली आणि आम्ही ती मान्य केली. त्या निर्णयात आमच्या पक्षाचा कोणताही सहभाग नव्हता,” असे त्यांनी सांगितले.
विलिनीकरणाच्या कथित चर्चांबाबत समोर आलेल्या व्हिडिओविषयी बोलताना मुख्यमंत्री म्हणाले की, “जर अजित पवार आणि शरद पवार यांच्यात काही चर्चा सुरू असतील, तर त्याचा आमच्याशी संबंध नव्हता. असा निर्णय झाला असता तर मित्रपक्ष म्हणून आमचा सल्ला घेतला गेला असता. मात्र यासंदर्भात आमच्याशी कोणतीही चर्चा झाली नव्हती. काही ‘सीक्रेट’ असेल, तर त्याची मला माहिती नाही.”
दरम्यान, विमान दुर्घटनेच्या चौकशीसंदर्भात अधिकृत पातळीवर पुढील हालचालींकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे. मुख्यमंत्री फडणवीस यांच्या आवाहनानंतर राजकीय आरोप-प्रत्यारोपांना काहीसा विराम मिळतो का, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.



