वॉशिंग्टन-वृत्तसेवा | निवडणुक रॅलीत सहभागी झालेले अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष डोनॉल्ड ट्रंप यांच्यावर गोळीबार करण्यात आला असून ते यात जखमी झाल्याचे वृत्त आहे.
अमेरिकेतील पेनसिल्व्हेनियामध्ये माजी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्यावर हल्ला झाला आहे. रॅलीदरम्यान झालेल्या गोळीबारात डोनाल्ड ट्रम्प जखमी झाले. ट्रम्प यांच्या उजव्या कानात गोळी लागल्याचा दावा करण्यात आला आहे. तथापि, ट्रम्प यांच्या चमूने एक निवेदन जारी करत ते ठीक असून त्यांच्यावर आवश्यक उपचार केले जात असल्याची माहिती दिली आहे. रॅलीत झालेल्या गोळीबारानंतर ट्रम्प यांच्या चेहर्यावरही रक्त दिसत होते. हल्लेखोराने जवळच्या छतावरून रायफल वापरून गोळीबार केल्याचे सांगण्यात आले. रॅलीत उपस्थित लोकांचे म्हणणे आहे की डोनाल्ड ट्रम्प यांच्यावरील हल्ला अत्यंत जीवघेणा होता आणि थोडीशी चूक त्यांना आपला जीव गमवावी लागू शकते. सुदैवाने यातून ते बचावले आहेत.
पेनसिल्व्हेनिया राज्याचे उमेदवार डेव्हिड मॅककॉर्मिक यांनी फॉक्स न्यूजला सांगितले की, ट्रम्प यांच्या भाषणादरम्यान ८ ते १० गोळ्या झाडण्यात आल्या. ते म्हणाले की गोळ्या अध्यक्षांच्या डाव्या बाजूने आल्याचे दिसत आहे आणि त्यांच्या मागे असलेल्या एका व्यक्तीला गोळी लागली आहे. एका व्यक्तीने बीबीसीशी बोलताना दावा केला की, त्याने स्वतः जवळच्या इमारतीच्या छतावर रायफल असलेल्या एका व्यक्तीला ट्रम्प यांच्या रॅलीत गोळीबार करताना पाहिले. आमच्यापासून ५० फूट अंतरावर असलेल्या इमारतीच्या छतावर एक माणूस रेंगाळत होता, तो म्हणाला. त्याच्याकडे रायफल असल्याचे आम्हाला स्पष्ट दिसत होते. या हल्लेखोराने उंच इमारतीवरून ट्रंप यांच्यावर गोळीबार केला. यात रॅलीत सहभागी झालेला एक व्यक्ती ठार झाला असून दोन जण गंभीर जखमी झाले आहेत. तर सुरक्षा रक्षकांनी केलेल्या गोळीबारात हल्लेखोर ठार झाला असून त्याची ओळख पटविण्याचे काम सुरू करण्यात आले आहे.
स्वत: ट्रंप यांनी मात्र थोड्या वेळात सोशल मीडियाच्या माध्यमातून आपल्यावर गोळीबार करण्यात आला असून कानाच्या बाजूला गोळी लागल्याने जखमी झालो असल्याची माहिती दिली आहे. आपण सुरक्षित असल्याचे देखील त्यांनी या पोस्टमध्ये नमूद केले आहे.