घरगुती गॅसचा काळाबाजार; दोन जणांवर गुन्हा दाखल

जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । जळगाव शहरातील तांबापूरा भागात वाहनामध्ये घरगुती गॅस भरला जात असताना महसूल व पोलिस पथकाने कारवाई केली. यामध्ये कौसर शेख हारुण काकर (३८, रा. तांबापुरा) याला रंगेहाथ पकडले तर उदय पाटील नामक कारचालक पळून गेला. ही कारवाई मंगळवारी ११ जून रोजी सकाळी ११ वाजता करण्यात आली. याप्रकरणी सायंकाळी ७ वाजता एमआयडीसी पोलीस ठाण्यात दोन जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत अधिक माहिती अशी की, जळगाव शहरातील तांबापुरा परिसरात वाहनामध्ये घरगुती गॅस भरला जात असल्याची माहिती मिळाल्यावरून नायब तहसीलदार देवेंद्र चंदनकर, पुरवठा निरीक्षक अनिल पवार, मंडळ अधिकारी राजेश भंगाळे, तलाठी राहुल सोनवणे, एमआयडीसी पोलिस ठाण्याचे पोउनि दत्तात्रय पोटे, रवींद्र चौधरी, पोहेकॉ सचिन पाटील, पोकॉ ईम्रान बेग, छगन तायडे, किरण पाटील यांच्यासह पथक मंगळवारी ११ जून रोजी सकाळी ११ वाजता जळगाव शहरातील तांबापूरा परिसरात दाखल झाले. याच परिसरात एका पत्र्याच्या घरामध्ये कौसर शेख हारुण काकर हा कारमध्ये (क्र. एमएच ०४, एफएफ ६४५१) घरगुती गॅस भरत होता. तेथे असलेल्या कारचालकाने त्याचे नाव उदय पाटील सांगितले व तो पळून गेला. पथकाने १ लाख ३० रुपये किमतीची कार, सहा सिलबंद सिलिंडर, एक अर्धे भरलेली गॅस हंडी, चार वेगवेगळ्या कंपनीचे सिलिंडर, पंप, इलेक्ट्रॉनिक काटा व इतर साहित्य असे एकूण एक लाख ४५ हजार ४०० रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त केला.

याप्रकरणी सायंकाळी ७ वाजता पुरवठा निरीक्षक अनिल पवार यांनी दिलेल्या फिर्यादीवरून कौसर शेख हारुण काकर व उदय पाटील या दोघांविरोधात एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोहेकॉ रामकृष्ण पाटील करीत आहेत.

Protected Content