सावदा ता.रावेर-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | नोंदणी व मुद्रांक विभागाच्या संगणकीकरणाशी संबंधित वाढीव खर्च लक्षात घेता दस्त हाताळणी शुल्कात वाढ करण्यात आली आहे. यापुढे दस्त नोंदणी दरम्यान आकारले जाणारे शुल्क ₹२० ऐवजी आता ₹४० इतके आकारले जाणार आहे. ही वाढ १७ एप्रिल २०२५ पासून अधिकृतपणे लागू होणार असल्याची माहिती सह जिल्हा निबंधक (वर्ग १) तथा मुद्रांक जिल्हाधिकारी सुनील पाटील यांनी दिली.



‘बांधा, वापरा, हस्तांतरित करा’ या तत्वावर विभागाचे खाजगीकरण करून संगणकीकरण करण्यात येत आहे. या प्रक्रियेत हार्डवेअर, सॉफ्टवेअर, कंझ्युमेबल्स, मनुष्यबळ अशा बाबींमध्ये मोठ्या प्रमाणावर खर्च वाढल्याने दस्त हाताळणी शुल्क वाढविणे अपरिहार्य बनले होते. शासन निर्णय क्रमांक: मुद्रांक-2025/प्र.क्र.9/म-1 (धोरण), दिनांक १५ एप्रिल २०२५ नुसार ही वाढ अधिकृतरीत्या मंजूर करण्यात आली आहे.
‘आय-सरिता’ या सॉफ्टवेअरमध्ये आवश्यक तांत्रिक बदल करून त्याची चाचणी एन.आय.सी. कडून १६ एप्रिल रोजी पार पडली असून, त्यानंतर १७ एप्रिलपासून नव्या दरांची अंमलबजावणी सुरू केली जाणार आहे. या संदर्भात संबंधित सर्व दुय्यम निबंधकांना सूचना देण्यात येणार असून, नागरिकांना या बदलाची माहिती मिळावी यासाठी प्रसिद्धी माध्यमांतून जागरूकता निर्माण केली जाणार आहे. तसेच नागरिक व अधिकाऱ्यांना आवश्यक मार्गदर्शनही उपलब्ध करून देण्यात येणार आहे.


