Home आरोग्य CCMP कोर्स उत्तीर्ण डॉक्टरांना रजिस्ट्रेशन मिळावे; होमिओपॅथिक डॉक्टर्स संघटनेची मुख्यमंत्र्यांकडे मागणी 

CCMP कोर्स उत्तीर्ण डॉक्टरांना रजिस्ट्रेशन मिळावे; होमिओपॅथिक डॉक्टर्स संघटनेची मुख्यमंत्र्यांकडे मागणी 

0
174

जळगाव-लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी ।  राज्य सरकारच्या परवानगीने आणि न्यायालयाच्या आदेशाने वैध ठरवलेल्या CCMP कोर्ससाठी पात्र ठरलेल्या होमिओपॅथिक डॉक्टरांना अजूनही महाराष्ट्र मेडिकल कौन्सिलकडून (MMC) रजिस्ट्रेशन दिले जात नसल्याने संतप्त झालेल्या जळगाव जिल्हा होमिओपॅथिक डॉक्टर्स संघटनेने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे तातडीने हस्तक्षेपाची मागणी केली आहे. यासंदर्भात एक निवेदन सादर करत डॉक्टरांनी स्पष्ट शब्दांत चेतावणी दिली आहे की, न्यायालयाच्या आदेशानंतरही जर रजिस्ट्रेशन प्रक्रियेत अडथळे आणले गेले, तर संघटना आयएमएच्या विरोधात तीव्र आंदोलन छेडेल.

2014 साली राज्य सरकारने होमिओपॅथिक डॉक्टरांना मर्यादित प्रमाणात अॅलोपॅथिक औषधांचा वापर करण्यास परवानगी दिली होती. त्यासाठी MBBS महाविद्यालयांमध्ये CCMP (Certificate Course in Modern Pharmacology) नावाचा एक वर्षाचा अधिकृत कोर्स सुरू करण्यात आला होता. या कोर्सला महाराष्ट्र मेडिकल कौन्सिल अ‍ॅक्ट 1965 अंतर्गत वैध मान्यता असून, शेड्युल 28 नुसार याचे स्वतंत्र रजिस्ट्रेशन करण्याची तरतूद आहे.

तथापि, इंडियन मेडिकल असोसिएशन (IMA) ने या कोर्सविरोधात मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती. मात्र, न्यायालयाने या याचिकेवर कुठलीही स्थगिती न देता उलट MMC ला रजिस्ट्रेशन सुरू करण्याचे आदेश दिले. कोर्टाच्या या स्पष्ट निर्देशानंतर देखील MMC आणि राज्यातील काही अधिकारी आयएमएच्या दबावाखाली काम करत असल्याचा गंभीर आरोप या निवेदनात करण्यात आला आहे.

होमिओपॅथिक डॉक्टर्स संघटनेच्या मते, गेल्या दहा वर्षांपासून आयएमए सातत्याने या कोर्सविरोधात राज्य सरकारवर दबाव टाकत असून, त्यामुळे ग्रामीण व अर्ध-शहरी भागात आरोग्य सेवा देणाऱ्या हजारो डॉक्टरांच्या सेवेला अडथळा निर्माण झाला आहे. राज्यातील 13 कोटी नागरिकांना सुलभ आरोग्यसेवा मिळावी म्हणून कार्यरत असलेले CCMP डॉक्टर न्यायालयीन निर्णयानंतरही रजिस्ट्रेशनपासून वंचित राहात आहेत.

या पार्श्वभूमीवर जळगाव जिल्हा होमिओपॅथिक डॉक्टर्स संघटनेने कार्यालयात पत्रकार परिषद घेऊन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना एक निवेदन सादर केले आहे. त्यात एमएमसीला तातडीने CCMP रजिस्ट्रेशन सुरू करण्याचे निर्देश देण्याची मागणी करण्यात आली आहे. यावेळी जिल्हाध्यक्ष रितेश पाटील, प्रभारी जिल्हाध्यक्ष सुशील मंत्री, उपाध्यक्ष मनोज बिसपुते, सचिव प्रशांत मंत्री आदी उपस्थित होते.


Protected Content

Play sound