जळगाव प्रतिनिधी । हॉस्पिटलमध्ये काम मागण्यासाठी गेलेल्या डॉक्टरचाच महागडा मोबाईल चोरणाऱ्या संशयित आरोपीला जिल्हा पेठ पोलीसांनी अटक केली असून त्याच्या ताब्यातील चोरीचा मुद्देमाल हस्तगत केला आहे.
हाताला काम नाही म्हणून ऋषिकेश समाधान पाटील (१९, रा. टागोर नगर, मुळ रा. कठोरा ता. जळगाव) हा महाबळ कॉलनीतील एका डॉक्टराकडे काम मागायला गेला. काम नाही, असे उत्तर मिळताच त्या भामट्याने डॉक्टराचाच महागडा मोबाईल घरातून चोरून नेल्याचा प्रकार समोर आला आहे़ या चोरट्याला जिल्हापेठ पोलिसांनी अटक केली असून त्याची जामीनावर सुटका झाली आहे. दरम्यान, ही बाब पोलिसांच्या तपासात समोर आली आहे. विशेष म्हणजे, प्रतापनगरातील एका बंद रूग्णालयातून चोरलेले ५० हजार रूपयांचे वैद्यकीय साहित्य सुध्दा त्याच्याजवळ आढळून आले असून ते पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.
गेल्या काही दिवसांपासून शहरात चोरट्यांनी धुमाकूळ घातला आहे. चोरी करण्याच्या भल्या भल्या शक्कल सराईत चोर वापरतात आणि आपली चोरी सिध्दीस नेतात़ असाच एक प्रकार समोर आला आहे. प्रताप नगरातील बंद पडलेल्या रूग्णालयातून वैद्यकीय साहित्य चोरी केल्यानंतर ऋषिकेश पाटील हा चोरटा तीन ते चार दिवसांपूर्वी एका मेडिकल स्टोअरवर ते विक्री करण्यासाठी गेला व त्याने ते साहित्य चोरीचे असल्याचे सांगितले़ दरम्यान, ही बाब जिल्हापेठ पोलिसांना कळताच, त्यांनी ऋषिकेश याला ताब्यात घेतले़ नंतर मंगळवारी रात्री त्याच्या टोगार नगरातील खोलीची झाडाझडती घेतली असता, त्यात पोलिसांना सुमारे ५० हजार रूपये किंमतीचे वैद्यकीय साहित्य आढळून आले़ सोबतच एक महागडा मोबाईलही सापडून आला़ नंतर त्यास पोलीस ठाण्यात नेवून चौकशी केली असता त्याने गुन्हा केल्याची कबुली देत कोठून चोरी केली त्याचीही माहिती दिली.
अनेक दिवसांपासून चोरत होता साहित्य
प्रताप नगरातील एक बंद रूग्णालयात पडून असलेले वैद्यकीय साहित्य ऋषिकेश पाटील हा गेल्या अनेक दिवसांपासून चोरत होता़ त्यात सलाईन, मास्क आदी साहित्य होते़ मात्र, तो ते साहित्य विक्री करण्यास निघाल्यानंतर पोलिसांच्या जाळयात अडकल्याचे त्याने पोलिसांना सांगितले़ दरम्यान, तो एका रूग्णालयात कामाला असल्याचेही त्याने पोलिसांना सांगितले़
ज्याच्याकडे काम मागायला गेला त्याचाच लांबविला मोबाईल
चोरटा ऋषिकेश पाटील हा गेल्या दहा दिवसांपूर्वीच एका रूग्णालयात कामाला लागला आहे़ मात्र, त्याआधी हाताला काम नसल्यामुळे तो महाबळ कॉलनीतील डॉ़ मेहता (पूर्ण नाव माहित नाही) यांच्याकडे काम मागण्यासाठी गेला होता़ काम नसल्यामुळे डॉ़ मेहता यांनी त्यास सध्या काम नसल्याचे सांगितले़ मात्र, ऋषिकेश याने नकार मिळाल्यानंतर चक्क डॉक्टराचाच महागडा मोबाईल घरातून चोरून नेला़ ही बाबही पोलिसांच्या तपासात समोर आली असून पोलिसांनी मोबाईलही जप्त केला आहे़
यांनी केली कारवाई
जिल्हापेठ पोलिसांनी ऋषिकेश पाटील या भामट्याला मंगळवारी रात्री अटक केली होती. दुसऱ्या दिवशी बुधवारी त्यास न्यायालयात हजर केले असता त्याची जामीनावर सुटका करण्यात आली आहे. दरम्यान, त्याने चोरी केलेला मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला आहे. जिल्हापेठ पोलीस ठाण्याचे पोलीस निरिक्षक अकबर पटेल यांच्या मार्गदर्शनाखाली एपीआय सचिन जाधव, प्रवीण भोसले व प्रशांत जाधव यांनी ही कारवाई केली आहे़ याप्रकरणी जिल्हापेठ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.