रावेर – लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी । रस्त्यावर अपघातग्रस्त व्यक्तीला मदतीऐवजी दुर्लक्षित करण्याचे प्रकार आपण अनेकदा पाहतो, परंतु रावेर तालुक्यात एक अशी हृदयस्पर्शी घटना घडली, ज्यात डॉक्टर दाम्पत्याने आपली सामाजिक जबाबदारी जपत एक व्यक्तीचे प्राण वाचवले. रावेर-भुसावळ रस्त्यावर झालेल्या अपघातात गंभीर जखमी झालेल्या दुचाकीस्वाराला रस्त्यावर अचेत अवस्थेत पाहून डॉक्टरांनी वेळ न दवडता तात्काळ उपचार करत त्याचा जीव वाचवला. या माणुसकीच्या कार्यामुळे परिसरात त्या दाम्पत्याचे कौतुक होत आहे.

ही घटना काल दुपारी घडली. रावेर येथील सुप्रसिद्ध डॉक्टर दाम्पत्य डॉ. संदीप पाटील आणि डॉ. योगिता पाटील हे खाजगी कामानिमित्त रावेरहून जळगावकडे निघाले होते. दरम्यान, पाडळसे-भुसावळ रस्त्यावर त्यांना एका दुचाकीस्वाराचा अपघात झाल्याचे दिसून आले. पावसामुळे रस्ता ओला असून, मोटारसायकल घसरून इसम रस्त्यावर बेशुद्ध पडला होता. अनेक वाहनचालक त्या दिशेने जात असूनही मदतीस थांबले नाहीत. मात्र, डॉक्टर पाटील दाम्पत्याने आपली गाडी थांबवली आणि तात्काळ मदतीस धाव घेतली.

गाडीतील प्राथमिक उपचार किट वापरून त्यांनी अपघातग्रस्तावर तत्काळ उपचार सुरू केले. इंजेक्शन आणि प्राथमिक औषधोपचारानंतर काही वेळात तो शुद्धीवर आला. त्याचे नाव व गाव विचारता तो आसोदा गावचा रहिवासी असल्याचे स्पष्ट झाले. शुद्धीवर येताच तो भावनिक झाला आणि डॉक्टरांकडे पाहून म्हणाला, “थँक यू डॉक्टर, तुमच्यामुळेच मला आज जीवनदान मिळालं.”
ही संपूर्ण घटना जवळच उभ्या असलेल्या काही स्थानिकांनी पाहिली आणि डॉक्टर दाम्पत्याच्या या माणुसकीच्या कार्याचे मनापासून कौतुक केले. सार्वजनिक रस्त्यांवर अपघातग्रस्त व्यक्तींना दुर्लक्षित करणे ही समाजाची एक मोठी समस्या बनली आहे. अशा परिस्थितीत डॉ. संदीप पाटील आणि डॉ. योगिता पाटील यांनी दाखवलेली संवेदनशीलता आणि तत्परता खऱ्या अर्थाने ‘देवदूत’ ठरली आहे.



