नवी दिल्ली-लाईव्ह ट्रेंडस न्यूज वृत्तसेवा | राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातील फुटीनंतर केंद्रीय निवडणूक आयोगाने पक्ष अजित पवारांच्या बाजूने निकाल देत घड्याळ हे चिन्ह त्यांना दिला होता. पण त्यानंतर शरद पवार गटाने त्यावर आक्षेप घेत सुप्रीम कोर्टात धाव घेतली.
सुप्रीम कोर्टात झालेल्या सुनावणीवेळी शरद पवार गटांच्या वकिलांकडून घड्याळ हे चिन्हे अजित पवार गटाने वापरू न देण्याची मागणी कोर्टात केली. ही सुनावणी न्यायाधीश सूर्यकांत आणि के. व्ही. विश्वनाथन यांच्यासमोर झाली. ज्येष्ठ विधिज्ञ अभिषेक मनू सिंघवी यांनी अजित पवार गटाकडून शरद पवारांचे नाव आणि फोटो वापरून त्यांच्या लोकप्रियतेचा फायदा घेतला जात असल्याचे कोर्टात सांगितले. सिंघवी यांनी कोर्टात शरद पवारांचा फोटो असलेली अजित पवार गटाची पोस्टरही दाखवली. तुमच्यामध्ये हिंमत असेल तर तुम्हीच मते मिळवा. शरद पवारांचे नाव वापरून कशाला मते मागता, असा मुद्दा त्यांनी उपस्थित केला.
कोर्टानेही अजित पवार गटाला ठणकावताना तुमच्यात आत्मविश्वास असेल तर तुमचेच फोटो वापरा, त्यांचे फोटो का वापरत आहात, असा सवाल उपस्थित केला. त्यानंतर कोर्टाने अजित पवार गटाला घड्याळ हा चिन्ह वापरू नका असा सल्ला ही दिला.