Home Cities जळगाव दिवाळीचा उत्साह शिगेला! जळगावच्या बाजारपेठांमध्ये तुफान गर्दी, कोट्यवधींची उलाढाल

दिवाळीचा उत्साह शिगेला! जळगावच्या बाजारपेठांमध्ये तुफान गर्दी, कोट्यवधींची उलाढाल


जळगाव लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । येत्या काही दिवसांवर आलेल्या दिवाळी सणाच्या पार्श्वभूमीवर जळगाव शहरातील बाजारपेठांमध्ये खरेदीसाठी मोठी गर्दी उसळली आहे. शहरातील फुले मार्केटसह महात्मा गांधी रोड, नवीपेठ आणि इतर प्रमुख बाजारपेठ परिसर जळगावकरांच्या गर्दीने अक्षरश: गजबजून गेले आहेत. दिवाळीनिमित्त करण्यात येत असलेल्या या ‘बंपर’ खरेदीमुळे बाजारपेठेत कोट्यवधींची उलाढाल होत असून, स्थानिक अर्थकारणाला मोठी झळाळी मिळाली आहे.

बाजारपेठेत सर्वत्र उत्साह आणि लगबग दिसून येत आहे. आकर्षक रंगीबेरंगी आकाश कंदील, सुबक रांगोळीचे साहित्य, रेडीमेड तोरणे, विविध प्रकारच्या पणत्या आणि विद्युत रोषणाईच्या वस्तूंच्या खरेदीसाठी नागरिकांनी प्रचंड गर्दी केली आहे. घरातील सजावटीच्या वस्तूंसह नवीन कपडे, मिठाई आणि दिवाळी फराळाच्या साहित्याची खरेदीही मोठ्या प्रमाणात सुरू आहे. लहान मुलांपासून ते वयोवृद्धांपर्यंत सर्वच जण खरेदीच्या उत्साहात मग्न आहेत.

बाजारपेठेत वाढलेल्या या गर्दीमुळे शहरातील वाहतूक व्यवस्थेवर मात्र मोठा ताण आला आहे. गर्दी नियंत्रित ठेवण्यासाठी शहर पोलिसांनी फुले मार्केटजवळ शास्त्री टॉवरसमोरून बाजारपेठेत येणाऱ्या मार्गावर ‘नो एन्ट्री’ (प्रवेश बंद) करून बॅरिकेट्स लावले आहेत. यामुळे दुचाकीस्वार आणि इतर वाहनधारकांना वळण रस्त्यावरून जावे लागत आहे. पोलिसांच्या या प्रयत्नानंतरही, गर्दी आणि वाहतूक कोंडीचा प्रश्न गंभीर बनला आहे.

या वाहतूक कोंडीला आणखी एक कारण म्हणजे रस्त्यांवरच दुकाने थाटलेले किरकोळ विक्रेते. अनेक फेरीवाले आणि विक्रेत्यांनी रस्त्याचा मोठा भाग व्यापल्यामुळे सायंकाळच्या वेळी वाहतुकीची मोठी कोंडी होत आहे. पादचाऱ्यांना चालणेही कठीण झाले असून, वाहनधारकांना मार्ग काढण्यासाठी अक्षरशः कसरत करावी लागत आहे. ग्राहकांचा खरेदीचा उत्साह जरी मोठा असला तरी, या वाहतूक समस्येमुळे अनेक नागरिकांना मनस्ताप सहन करावा लागत आहे. प्रशासनाने तात्काळ उपाययोजना करून दिवाळीच्या दिवसांत तरी वाहतूक सुरळीत करावी, अशी मागणी जळगावकडून केली जात आहे.


Protected Content

Play sound