
बुलढाणा-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । महावितरणमधील कर्मचाऱ्यांचा कामाचा ताण कमी करून कामकाजात सुसूत्रता आणण्यासाठी अकोला परिमंडळात सोमवारपासून ग्राहकसेवा कार्यालयांच्या पुनर्रचनेला प्रारंभ झाला आहे. या नव्या रचनेत महावितरणच्या विभाग कार्यालयांमध्ये बदल नसला तरी, उपविभागांमध्ये कामांचे स्पष्ट विभाजन करण्यात आले आहे.

आता महावितरणच्या विभाग कार्यालयांमध्ये एक १० सदस्यीय विभागीय देखभाल व दुरुस्ती पथकाची निर्मिती करण्यात आली आहे. या पथकात अतिरिक्त कार्यकारी अभियंता, सहायक अभियंता व तांत्रिक कर्मचाऱ्यांचा समावेश असेल. विभागातील सर्व उपकेंद्र व ३३ केव्ही वीजवाहिन्यांची देखभाल व दुरुस्तीचे महत्त्वपूर्ण काम हे पथक सांभाळणार आहे.
सर्वात महत्त्वाचा बदल म्हणजे प्रत्येक विभागात सध्या अस्तित्वात असलेल्या उपविभागांचे महसूल व देयके तसेच देखभाल व दुरुस्ती अशा दोन स्वतंत्र उपविभागांमध्ये विभाजन करण्यात येणार आहे.
देखभाल व दुरुस्ती उपविभाग: या उपविभागातील कर्मचारी वीजयंत्रणेची देखभाल व दुरुस्ती, नवीन वीजयंत्रणा उभारणे, वीजपुरवठ्याच्या तक्रारींचे निवारण आणि वीजपुरवठा सुरळीत ठेवण्याचे कामे करतील. महसूल व देयके उपविभाग: या उपविभागातील अभियंते व कर्मचारी नवीन वीजजोडणी देणे, अचूक बिलिंग करणे, बिलिंग तक्रारींचे निवारण आणि थकबाकी वसुली ही महत्त्वपूर्ण कामे सांभाळतील.
या कामांच्या विभाजनामुळे अभियंते व तांत्रिक कर्मचाऱ्यांवर सरसकट सर्वच कामांचा ताण येणार नाही. त्यांना निवडक कामांवर अधिक लक्ष केंद्रित (फोकस) करता येईल. त्यामुळे कर्मचाऱ्यांच्या कार्यक्षमतेत वाढ होईल आणि ग्राहकांना मिळणारी सेवा अधिक दर्जेदार आणि तत्पर असेल. ग्रामीण भागातील शाखा कार्यालयांच्या कार्यपद्धतीतही अंशतः बदल करण्यात आले आहेत.



