जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । डॉ. बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्था (बार्टी), पुणे आणि सहाय्यक आयुक्त, समाज कल्याण, जळगाव यांच्या संयुक्त विद्यमाने अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमाती (अत्याचार प्रतिबंधक) कायदा १९८९ व सुधारित अधिनियम २०१६ बाबत जनजागृती करण्यासाठी जिल्हास्तरीय प्रशिक्षण कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले आहे.
ही कार्यशाळा मंगळवार, २९ जुलै २०२५ रोजी सकाळी १०.०० ते दुपारी २.०० या वेळेत अल्पबचत भवन, जिल्हाधिकारी कार्यालय परिसर, जळगाव येथे होणार आहे. जिल्हाधिकारी, जळगाव यांच्या मान्यतेने या कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले असून, यात विविध विभागांचे वरिष्ठ अधिकारी सहभागी होणार आहेत.

या कार्यशाळेमध्ये महसूल व वन विभागातील सर्व उपविभागीय अधिकारी (प्रांत), तहसीलदार, उपविभागीय दक्षता व नियंत्रण समिती सदस्य, तसेच गृह विभागातील उपविभागीय पोलीस अधिकारी, पोलीस निरीक्षक, नागरी हक्क संरक्षण शाखेतील अधिकारी/कर्मचारी यांना निमंत्रित करण्यात आले आहे. याव्यतिरिक्त, विधी व न्याय विभागातील मा. जिल्हा सरकारी अभियोक्ता, ग्रामविकास विभागातील गटविकास अधिकारी (बीडीओ), आणि आरोग्य विभागातील जिल्हा शल्य चिकित्सक, जिल्हा आरोग्य अधिकारी यांनाही या प्रशिक्षणासाठी बोलावण्यात आले आहे.
या प्रशिक्षणामागे अनुसूचित जाती-जमाती अत्याचार प्रतिबंधक कायद्याबाबत अधिकाधिक जाणीव, समज आणि अंमलबजावणीतील प्रभावीता वाढवणे, तसेच जातीय सलोखा आणि सामाजिक समतेचा संदेश समाजात पसरवणे हा मुख्य उद्देश आहे. सर्व संबंधित अधिकाऱ्यांनी कार्यशाळेला वेळेत उपस्थित राहावे, असे आवाहन प्र. सहाय्यक आयुक्त समाज कल्याण नंदा रायते आणि बार्टी पुणेचे प्रकल्प व्यवस्थापक नितीन सहारे यांनी केले आहे.



