जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । आयटीआय प्रशिक्षणार्थ्यांना रोजगाराभिमुख कौशल्ये प्राप्त होणे अत्यावश्यक असून औद्योगिक क्षेत्राशी प्रभावी समन्वय साधत अधिकाधिक रोजगाराच्या संधी उपलब्ध करून दिल्या जातील, असे प्रतिपादन जिल्हाधिकारी रोहन घुगे यांनी केले. कवयित्री बहिणाबाई चौधरी शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था, जळगाव येथे आयोजित जिल्हास्तरीय तंत्र प्रदर्शनाच्या उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते.

या तंत्र प्रदर्शनाचे आयोजन व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण अधिकारी पी. पी. चव्हाण यांच्या अध्यक्षतेखाली करण्यात आले. संस्थेचे प्राचार्य नवनीत चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली हा उपक्रम राबविण्यात आला. कार्यक्रमाला आयएमसी अध्यक्ष जितेंद्र कुमार जैन, कौशल्य विकास व रोजगार विभागाचे उपायुक्त संदीप गायकवाड तसेच शासकीय तंत्रनिकेतन, जळगावचे प्राचार्य डॉ. पी. पी. चौधरी यांची प्रमुख उपस्थिती होती.

जिल्हाधिकारी घुगे यांनी आपल्या भाषणात तांत्रिक शिक्षणाची बदलत्या औद्योगिक गरजांशी सांगड घालण्याचे महत्त्व अधोरेखित केले. प्रशिक्षणार्थ्यांनी आत्मविश्वास, कौशल्य आणि नाविन्यपूर्ण दृष्टिकोन विकसित केल्यास स्थानिक तसेच राष्ट्रीय स्तरावर रोजगाराच्या मोठ्या संधी उपलब्ध होऊ शकतात, असे त्यांनी नमूद केले.
व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण अधिकारी पी. पी. चव्हाण यांनी जिल्ह्यातील विविध संस्थांमधून सहभागी झालेल्या प्रशिक्षणार्थ्यांचे कौतुक केले. अशा प्रदर्शनांमुळे विद्यार्थ्यांना आपली कौशल्ये सादर करण्याची संधी मिळते आणि उद्योगविश्वाशी थेट संपर्क साधण्याचा मार्ग मोकळा होतो, असे त्यांनी सांगितले.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक एम. पी. सूर्यवंशी यांनी केले, तर आभार प्रदर्शन संस्थेचे उपप्राचार्य नितीन चौधरी यांनी मानले. तंत्र प्रदर्शन यशस्वी करण्यासाठी संस्थेतील सर्व निदेशक, प्रशिक्षणार्थी तसेच सहकारी कर्मचाऱ्यांनी परिश्रम घेतले. प्रदर्शनात विविध तांत्रिक प्रकल्प, उपकरणे आणि कौशल्याधारित सादरीकरणे पाहण्यासाठी मोठी गर्दी झाली होती.



