जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | राज्यात विधानसभा निवडणूक सुरु असून येत्या 20 नोव्हेंबर रोजी मतदान होणार आहे. या लोकशाहीच्या उत्सवात मतदानाचा लोकशाहीने दिलेला आपला हक्क बजावा तसेच शंभर टक्के लोकांनी यात सहभाग नोंदवावा असे आवाहन जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी श्री. अंकित यांनी केले. पंचायत समिती जळगाव तर्फे आज दि 30 ऑक्टोबर 2024 रोजी शिरसोली येथील बारी समाज माध्यमिक विद्यालयात स्वीप मतदार जनजागृती उपक्रमा अंतर्गत माननीय मुख्य कार्यकारी अधिकारी श्री. अंकीत यांच्या उपस्थितीत विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. त्यावेळी ते बोलत होते.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक बी. एस. अकलाडे यांनी केले. गटविकास अधिकारी श्वेता पालवे, शिक्षणाधिकारी प्राथमिक श्री विकास पाटील यांनी नागरिकांना कोणत्याही वंश,धर्म, जात इत्यादीचा विचार न करता सुयोग्य अशा उमेदवाराला सर्वांनी भरभरून मतदान करावे असे आवाहन केले. या उपक्रमांमध्ये स्वीप अंतर्गत शिरसोली प्र न ग्रामपंचायत कार्यालयाच्या वतीने मतदान जागृती महारॅलीचे आयोजन करण्यात आले होते. त्यासोबतच अहिराणी पथनाट्याद्वारे मतदान जनजागृती गीत, रांगोळी स्पर्धा ,सेल्फी पॉईंट व सिग्नेचर मोहीम, अशा या विविध उपक्रमांचे मान्यवरांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले. श्री अंकित यांनी मतदान जनजागृती रॅलीला हिरवे झेंडे दाखवून रॅलीची सुरुवात केली.
योगेश भालेराव यांनी जनजागृती गीत तर धरणगाव पंचायत समिती च्या कला पथकाने पथनाट्य सादर केले. याप्रसंगी रांगोळ्या मधून मतदान करण्याचा संदेश देण्यात आला. मतदान करण्याची प्रतिज्ञा याप्रसंगी घेण्यात आली. या कार्यक्रम प्रसंगी प्राथमिक शिक्षणाधिकारी श्री विकास पाटील,गटशिक्षणाधिकारी श्रीमती सरला पाटील , गटशिक्षणाधिकारी पंचायत समिती धरणगाव श्रीमती भावना भोसले ,उपशिक्षणाधिकारी श्री फिरोज पठाण ,शालेय पोषण आहार अधीक्षक विजय पवार, महिला विकास अधिकारी संपदा संत, आरोग्य अधिकारी डॉ पांढरे सरपंच हिलाल भिल,उषा बाई पाटील व विविध विभागाचे अधिकारी व गावातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.