Home धर्म-समाज फैजपूर येथे जमाअत-ए-इस्लामी हिंदचा जिल्हास्तरीय मेळावा

फैजपूर येथे जमाअत-ए-इस्लामी हिंदचा जिल्हास्तरीय मेळावा


फैजपूर-लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी । जमाअत-ए-इस्लामी हिंद, जिल्हा जळगाव यांच्या वतीने फैजपूर येथील मिल्लत नगर ग्राउंडवर एकदिवसीय जिल्हास्तरीय सार्वजनिक मेळावा मोठ्या उत्साहात पार पडला. “अल्लाहच्या रहमतीपासून निराश होऊ नका” या विषयावर आयोजित या मेळाव्यास जिल्हाभरातून मोठ्या संख्येने पुरुष-महिला, ज्येष्ठ नागरिक तसेच युवक-युवती उपस्थित होते. सकाळी १० ते सायंकाळी ५ वाजेपर्यंत कार्यक्रम झाला.

मेळाव्याची सुरुवात मा. मोहम्मद समिउद्दीन (समिउ) साहेब यांच्या दर्स-ए-कुरआनने झाली. त्यानंतर नाझिम अब्दुर्रऊफ साहेब यांनी खुतबा-ए-इस्तिकबाल सादर केला.

मौलाना वलीउल्लाह सईदी फलाही (नायब अमीर, जमाअत-ए-इस्लामी हिंद) यांनी मेळाव्याची उद्दिष्टे स्पष्ट करत समारोप सत्रात विषयावर प्रेरणादायी मार्गदर्शन केले. प्रतिकूल परिस्थितीतही ईमानदार व्यक्तीने अल्लाहच्या मदतीबाबत आशावादी राहावे, असे त्यांनी सांगितले.

मौलाना इलियास फलाही (अमीर-ए-हलक़ा, महाराष्ट्र) यांनी सध्याच्या परिस्थितीत मुसलमानांनी उचलावयाच्या प्रत्यक्ष पावलांवर तसेच संघटनात्मक एकतेच्या गरजेवर प्रकाश टाकला.

जिल्हा नाझिम जनाब सुहेल अमीर शेख यांनी विचारप्रवर्तक भाषणात विविध आकडेवारी व ठोस उदाहरणांच्या आधारे देशाच्या उभारणीत युवकांची भूमिका अधोरेखित केली. युवकांनी सक्रिय सहभाग घेतल्यासच देश अधिक सक्षम बनेल, असे त्यांनी नमूद केले.

यावेळी जनाब वाजिद कादरी (औरंगाबाद) यांनी दीनच्या दावतीचे महत्त्व स्पष्ट केले, तर मा. साजिदा परवीन साहेबा यांनी “समाज आणि महिला” या विषयावर मोलाचे विचार मांडले.

मेळाव्यात उत्कृष्ट शिस्त, वेळेचे काटेकोर पालन आणि युवक-युवतींचा उत्स्फूर्त सहभाग पाहायला मिळाला. शेवटी अब्दुल समिउद्दीन साहेब यांच्या दुआने कार्यक्रमाची सांगता झाली. या यशस्वी आयोजनासाठी SIO, GIO, खवातीन तसेच जमाअतच्या संलग्न संघटनांनी विशेष परिश्रम घेतले, असे आयोजकांनी सांगितले.


Protected Content

Play sound