पाचोरा – लाईव्ह ट्रेंडस न्युज प्रतिनिधी । आज राष्ट्रीय ग्राहक दिनानिमित्त पाचोरा येथील तहसिलदार कार्यालयाच्या पुरवठा विभागामार्फत जिल्हास्तरीय ग्राहक दिन निर्मल इंटरनॅशनल स्कूलमध्ये विना ग्राहकांचा साजरा करण्यात आला.
कार्यक्रामाचे अध्यक्षस्थानी उपविभागीय अधिकारी डॉ. विक्रम बांदल होते. ग्राहक दिन हा ग्राहकांच्या अडी अडचणी सोडविणे, समस्या जाणून घेणे, ग्राहक कायदा व चळवळी विषयी त्यांच्यात जनजागृती करणे हा उद्देश असतो. मात्र कार्यक्रमात केवळ तालुका भरातील रेशन दुकानदार व ग्राहक चळधळीच्या विविध संघटनांचे प्रतिनिधी उपस्थित होते. मात्र एकही ग्राहक नसल्याने तक्रारी येण्याचा प्रश्नच निर्माण झाला नाही.
दरवर्षी पाचोरा येथील तहसिल कार्यालयात ग्राहक दिनाचा कार्यक्रम आयोजित करण्यात येतो. मात्र पुरवठा विभागाने यावर्षी पाचोरा शहरापासून सुमारे पाच किलोमीटर अंतरावर कार्यक्रमाचे आयोजन केले होते. यामुळे सर्वसामान्य नागरीक व ग्राहक याठिकाणी येवू शकले नाही. यामुळे पुरवठा विभागाविषयी नाराजीचा सूर पहावयास मिळाला.
यावेळी तहसिलदार कैलास चावडे, पोलिस निरीक्षक किसनराव नजनपाटील, सहाय्यक गटविकास अधिकारी अजितसिंग पवार, तालुका कृषी अधिकारी रमेश जाधव, आर. एम. भालेराव, ग्राहक मंचचे जिल्हा अधीक्षक डॉ. अनिल देशमुख, ग्राहक सेवा संघाच्या तालुका अध्यक्षा प्रा. मंगला शिंदे, रेशन दुकानदार संघटनेचे जिल्हा कार्याध्यक्ष राजेंद्र महाजन, तालुका अध्यक्ष सुनिल पाटील, वजन मापे निरिक्षक आर. आर. मराठे, विवेक झरेकर, निर्मल इंटरनॅशनल स्कूलमचे प्राचार्य गणेश राजपूत, उपप्राचार्य प्रदिप सोनवणे, प्रशासकीय अधिकारी संतोष पाटील उपस्थित होते.
कार्यक्रमात बोलतांना उपविभागीय अधिकारी डॉ. विक्रम बांदल यांनी सांगितले की, ग्राहक चळवळ ही ग्राहकांचे हित जोपासणारी चळवळ असून ही चळवळ समाजातील शेवटच्या माणसापर्यंत पोहोचविली पाहिजे. ग्राहकांना असलेले अधिकार त्यांनी वापरले पाहिजे, त्याच प्रमाणे त्यांना आपल्या कर्तव्याचीही जाणीव असली पाहिजे. ग्राहक जागृत झाला तरच चळवळीचे महत्व आहे.
पाचोरा येथील जिल्हा स्तरीय कार्यक्रमात जिल्हाधिकारी अभिजित राऊत, जिल्हा पुरवठा अधिकारी सुनिल सुर्यवंशी, लिड बॅंकेचे मॅनेजर अरुण प्रकाश यांनी ऑनलाईन मार्गदर्शन केले. कार्यक्रमात तहसिलदार कैलास चावडे, डॉ. अनिल देशमुख, प्रा. मंगला शिंदे यांनी मार्गदर्शन केले. कार्यक्रमात ग्राहक जनजागृती साठी कार्य करणाऱ्या अनेकांना प्रशस्तीपत्र देऊन गौरविण्यात आले. तर ४९ दिव्यांगांना अंत्योदय योजनेचे रेशनकार्ड वाटप करण्यात आले.
कार्यक्रमात नगरदेवळा येथील शाहिर व त्यांच्या सहकाऱ्यांनी राष्ट्रीय गित गावून कार्यक्रमाची सुरूवात केली. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी पुरवठा विभागाच्या पुनम थोरात, अभिजित येवले, उमेश शिर्के, उमेश पुरी, साहेबराव पाटील, सोनवणे मामा, शिव पाटील यांनी अनमोल सहकार्य केले.