चोपड्यात ‘खान्देशरत्न बहिणाबाई चौधरी’ जिल्हास्तरीय साहित्य संमेलनाचे आयोजन

 

चोपडा प्रतिनिधी । शहरात दोन दिवस सारस्वतांचा मेळा भरणार आहे. महाराष्ट्र राज्य साहित्य व संस्कृती मंडळ, मुंबई व नगर वाचन मंदिर यांच्या संयुक्त विद्यमाने चोपड्यात जिल्हास्तरीय खान्देशरत्न बहिणाबाई चौधरी मराठी साहित्य संमेलन आयोजित करण्यात आले आहे. ‘स्व. डॉ. सुशिलाबेन शहा साहित्य नगरी’त हे संमेलन होणार आहे.

यावेळी उद्घाटन अ.भा. मराठी नाट्य संमेलनाचे अध्यक्ष जेष्ठ नाटककार प्रेमानंद गज्वी (मुंबई) यांच्याहस्ते करण्यात येणार आहे. यावेळी प्रमुख अतिथी म्हणून अ.भा.मराठी साहित्य संमेलनाचे माजी अध्यक्ष साहित्यिक फ.मु.शिंदे (औरंगाबाद), साहित्यिक प्रा.डॅा.केशव देशमुख (नांदेड), महाराष्ट्र राज्य साहित्य व संस्कृती मंडळाचे सदस्य कवि अशोक सोनवणे (चोपडा), रमेश पवार (अमळनेर), भोपाळ (मध्यप्रदेश) येथील मराठी साहित्य अकादमीच्या नवनियुक्त निदेशिका आणि चोपड्याच्या सुकन्या पौर्णिमाबेन हुंडीवाले (ब-हाणपुर), अभिनेता शंभू पाटील (जळगाव), साहित्यिक कुंदा प्रधान (कोल्हापूर) हे उपस्थित राहणार आहेत.

विविध साहित्यिक व सांस्कृतिक कार्यक्रमांचे नियोजन या संमेलनात दुपारी एक वाजता ‘बोलीभाषांचे मराठी साहित्यात योगदान’ यासंदर्भात परिसंवाद होणार असून अध्यक्षस्थानी कविवर्य अशोक सोनवणे राहतील. तर परिसंवादात डॅा.रमेश सुर्यवंशी (कन्नड), प्रा.वि.दा.पिंगळे (पुणे), डॅा.मिलिंद बागूल (धरणगाव) हे सहभागी होणार आहेत. त्याचप्रमाणे यावेळी होणाऱ्या कवि संमेलनाचे अध्यक्षस्थान कविवर्य रमेश पवार (अमळनेर) हे भुषविणार आहेत. त्यात प्रा.एस.टी.कुलकर्णी, डॅा.संजिवकुमार सोनवणे, रमेश धनगर, कृपेश महाजन, दिनेश चव्हाण, संजय सोनार, राजेंद्र पारे, अरुण जोशी, ललिता पाटील, प्राचार्य योगिता पाटील, तुषार लोहार, विलास पाटील खेडीभोकरी, किशोर नेवे, बाळकृष्ण सोनवणे, जया नेरे हे कवी सहभागी होणार आहेत.

दुपारी तीन वाजता साहित्यिक पौर्णिमाबेन हुंडीवाले यांचे कथाकथन होणार आहे. तर दुपारी चार वाजता जेष्ठ अभिनेते शंभू पाटील यांचे “गांधीजी” या विषयी नाट्य अभिवाचन होणार आहे.” बहिणाबाईच्या काव्यात्मक जीवनाचा भावस्पर्शी प्रवास” हा एकपात्री प्रयोग सांयकाळी सहा वाजता कुंदा प्रधान (कोल्हापूर) या सादर करणार आहेत. रात्री सात वाजता अपर्णा भट कासार (जळगाव) व समुहाच्या सांस्कृतिक कार्यक्रमाने साहित्य संमेलनाचा समारोप होणार आहे. सुत्रसंचालन प्रा.डॅा.रमेश माने (अमळनेर) हे करणार आहेत. आज महिला मंडळ माध्यमिक शाळेच्या प्रांगणावरील ‘स्व.डॅा.सुशिलाबेन शहा साहित्य नगरी’तील साहित्यिक व सांस्कृतिक कार्यक्रमात रसिक श्रोते, नाट्यप्रेमी आणि नागरिकांनी उपस्थित राहण्याचे आवाहन नगर वाचन मंदिराचे अध्यक्ष आशिष गुजराथी, उपाध्यक्ष प्रा.एस.टी.कुलकर्णी, कार्यवाह गोविंद गुजराथी, डॅा.परेश टिल्लू तसेच सर्व कार्यकारणी सदस्यांनी केले आहे.

Protected Content