जळगाव प्रतिनिधी । प्रत्येक कुटुंबातील ज्येष्ठ नागरिक महत्वाचे सदस्य आहेत. ज्येष्ठ नागरिकांच्या सुदृढ स्वास्थासाठी येत्या ज्येष्ठ नागरिक दिनी अर्थात १ ऑक्टोबर रोजी ज्येष्ठ नागरिकांचे कोरोना लसीकरण प्राधान्याने करून घ्यावे, अशा सूचना जिल्हाधिकारी अभिजित राऊत यांनी दिल्या.
जिल्हाधिकारी कार्यालयात ज्येष्ठ नागरिक समन्वय व सनियंत्रण समितीची सभा नुकतीच आयोजित करण्यात आली होती, त्यावेळी ते बोलत होते. जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. पंकज आशिया, पोलिस अधीक्षक डॉ. प्रवीण मुंडे, जिल्हा परिषदेचे जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. भीमाशंकर जमादार, जिल्हा महिला व बालकल्याण अधिकारी विजयसिंग परदेशी, समाजकल्याण विभागाचे सहाय्यक आयुक्त योगेश पाटील आदी उपस्थित होते.
जिल्हाधिकारी श्री. राऊत यांनी सांगितले, ज्येष्ठ नागरिक कुटुंबासाठी आधार असतात. त्यांच्या अनुभवाचा कुटुंबीयांनी लाभ घेतला पाहिजे. तसेच ज्येष्ठ नागरिक दिनानिमित्त विविध कार्यक्रमांचे ऑनलाइन आयोजन करावे. या दिवशी जिल्ह्यातील अधिकाधिक ज्येष्ठ नागरिकांनी कोविड – 19 चे लसीकरण करून घ्यावे, असेही आवाहन जिल्हाधिकारी यांनी केले. समाजकल्याण विभागाचे सहाय्यक आयुक्त श्री. पाटील यांनी ज्येष्ठ नागरिक अधिनियमाविषयीची माहिती बैठकीत दिली.