जळगाव (प्रतिनिधी) जिल्ह्यातील धरणातील पाणीसाठा कमी झाला आहे. त्यामुळे भविष्यातील पाणी टंचाईवर मात करण्यासाठी जिल्ह्यातील नागरीकांनी उपलब्ध पाण्याचा जपून वापर करावा असे आवाहन जिल्हाधिकारी डॉ. अविनाश ढाकणे यांनी केले आहे.
डाॅ. अविनाश ढाकणे पुढे म्हणाले की, सध्या राज्यात सर्वत्र दुष्काळी परिस्थिती निर्माण झाली असून या परिस्थितीमुळे जळगाव जिल्ह्यात पाणीटंचाई निर्माण झाली आहे. जिल्ह्यातील टंचाईची परिस्थिती जाणून घेण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नुकताच जिल्ह्यातील सरपंचाशी संवाद साधला आहे. त्यांचेकडून आलेल्या सुचना व तक्रारीवर तातडीने कार्यवाही करण्याच्या सुचना जिल्हा प्रशासनास दिल्या आहेत. त्यानुसार जिल्हा प्रशासन आवश्यक त्या उपाययोजना करीत आहे. जिल्ह्यातील नागरीकांना पिण्याचे पाणी उपलब्ध करून देण्यास प्रशासनाने प्राधान्य दिले आहे. त्याचबरोबर जिल्ह्यातील जनावरांना पिण्याचे पाणी व चारा उपलब्ध करून देण्यात देत आहे. याशिवाय ज्या ठिकाणी रोजगार हमीच्या कामांची मागणी येईल तेथे तातडीने कामे उपलब्ध करून देण्यात येत असल्याचेही त्यांनी सांगितले. जिल्ह्यातील टंचाई परिस्थितीवर मात करण्यासाठी जिल्ह्यातील नागरीकांनी पाण्याचा जपून वापर करण्याचे आवाहन केले. मागील वर्षी जिल्ह्यात सरासरी पेक्षा पाऊस कमी पडला असून भूगभातील पाण्याचा अमर्याद उपसा होत असल्यामुळे पाण्याची पातळी खाली गेली आहे. जळगाव जिल्ह्याला यापूर्वी पाण्याची फारशी टंचाई भासली नव्हती. इतिहासात पहिल्यांदाच जिल्ह्यात पाणी पुरवठा करणाऱ्या टँकरची संख्या २०० च्या वर पोहचणार आहे. अडचणीच्या परिस्थितीतही नागरीकाना पाणी उपलब्ध करुन देत आहे. निदान आतातरी नागरिकांनी पाण्याचे महत्व जाणून पाण्याचा आवश्यक तेवढाच वापर करावा. वापरलेले पाणी आपल्या घराशेजारील शोषखड्डा घेवून जमिनीतच मुरवून गावातच जिरवावं. जेणेकरुन गावातल्या कुपनलीकांना पाणी उपलब्ध होईल. तसेच गावात वृक्ष लागवडीसाठी प्राधान्य देऊन झाडे वाढवावीत. याशिवाय सर्व नागरिकांनी पाणी नियोजनामध्ये आपला सहभाग नोंदवावा.यावर्षी सरासरी इतका पाऊस पडेल. परंतू कमी पाऊस पडलाच तर सर्व नागरिकांनी मिळून भूगर्भातील पाण्याची पातळी वाढण्यासाठी प्रयत्न करणे गरजेचे असून पाण्याचा जपून वापर करावा व भविष्यात भूगर्भातील पाणीसाठा वाढण्यासाठी आपण सर्व मिळून प्रयत्न करु या. असेही जिल्हाधिकारी यावेळी म्हणाले.