अडावद (ता. चोपडा)-लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी । चोपडा तालुक्यातील अडावद येथे सुरू असलेल्या जनगणना २०२७ या महत्त्वाच्या अभियानाच्या कामकाजाची पाहणी जिल्हाधिकारी रोहन घुगे यांनी केली. त्यांनी या भेटीदरम्यान प्रगणक व पर्यवेक्षकांशी थेट संवाद साधून सूचना दिल्या तसेच ग्रामस्थांनी या महत्त्वाच्या उपक्रमात सहकार्य करावे, असे आवाहन केले.

जिल्हाधिकारी घुगे यांनी पदभार स्वीकारल्यानंतर प्रथमच चोपडा तालुक्याला भेट दिली. दुपारी सुभाष चौक येथील बालाजी मंदिर परिसरात त्यांनी जनगणनेच्या प्रत्यक्ष कामाची पाहणी केली. या वेळी तहसीलदार भाऊसाहेब थोरात, मंडलाधिकारी अजय पावरा, सरपंच बबनखाँ तडवी, पंचायत समितीचे विस्तार अधिकारी जे. पी. पाटील, ग्राम अधिकारी प्रमोद सैंदाने, ग्राम महसूल अधिकारी विजेंद्र पाटील तसेच जनगणना करणारे पर्यवेक्षक आणि प्रगणक उपस्थित होते.

जिल्हाधिकारी रोहन घुगे यांनी जनगणना २०२७ च्या डिजिटल स्वरूपातील कार्यपद्धतीचा सविस्तर आढावा घेतला. या वेळी त्यांनी संबंधितांना मोबाईल ऍपच्या वापराबाबत मार्गदर्शन केले. भारतात ही पहिलीच संपूर्ण डिजिटल जनगणना होणार असून तिचा प्रायोगिक टप्पा सध्या जळगाव जिल्ह्यातील चोपडा तालुक्यात राबवला जात आहे.
या जनगणनेचा पहिला टप्पा इमारतींची गणना व घरे ओळखून त्यांचे भौगोलिक स्थान निश्चित करण्यावर केंद्रित असेल, तर दुसऱ्या टप्प्यात लोकसंख्या गणना केली जाणार आहे. या प्रक्रियेसाठी दोन स्वतंत्र ऍपचा वापर करण्यात येणार असून, प्रथमच ‘स्व-गणना’ ही नवी पद्धत लागू करण्यात आली आहे. या माध्यमातून नागरिकांना स्वतःची माहिती सुरक्षितपणे वेब पोर्टलद्वारे भरता येणार आहे. जिल्हाधिकाऱ्यांनी याबाबत उपस्थित प्रगणकांना तांत्रिक मार्गदर्शन करत जनतेपर्यंत योग्य माहिती पोहोचवण्याचे निर्देश दिले.
या भेटीदरम्यान विकास सोसायटीचे संचालक सचिन महाजन, माजी उपसरपंच हनुमान महाजन, माजी पंचायत समिती उपसभापती ताहेर मण्यार, माजी उपसरपंच जावेदखा पठाण, रियाजअली सैय्यद, नितीन राजकुळे, सचिन पुराणिक, निर्जला ठाकूर, एस. जी. महाजन यांच्यासह अनेक ग्रामस्थ आणि जनगणना कर्मचारी उपस्थित होते.
जिल्हाधिकाऱ्यांच्या या भेटीमुळे जनगणना अभियानाबाबत ग्रामस्थांमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले असून, डिजिटल जनगणनेच्या यशस्वीतेसाठी सर्वांनी सहकार्याचे आश्वासन दिले आहे.



