Home Cities जळगाव कामगार व नागरिकांच्या संरक्षणासाठी जिल्हा प्रशासनाचे कडक निर्बंध

कामगार व नागरिकांच्या संरक्षणासाठी जिल्हा प्रशासनाचे कडक निर्बंध


 जळगाव- लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी । भारतीय हवामान विभागाने येत्या काळात तापमानात मोठी वाढ होण्याचा इशारा दिल्यानंतर, जळगाव जिल्हा प्रशासन सतर्क झाले असून उष्णतेच्या लाटेपासून कामगार आणि सर्वसामान्य नागरिकांचा बचाव करण्यासाठी महत्त्वपूर्ण मार्गदर्शक सूचना जारी केल्या आहेत. केंद्र शासनाच्या श्रम व रोजगार मंत्रालय तसेच राष्ट्रीय रोग नियंत्रण केंद्राने (NCDC) दिलेल्या निर्देशांनुसार, वाढत्या तापमानामुळे उद्भवणाऱ्या उष्माघाताच्या धोक्यापासून बचाव करण्यासाठी तातडीने उपाययोजना राबविण्याचे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे.

अत्यंत उष्णतेच्या परिस्थितीत विशेषतः उघड्यावर काम करणाऱ्या बांधकाम कामगारांना, वीटभट्टी मजूर, रोजंदारीवर काम करणारे कामगार आणि असंघटित क्षेत्रातील मजुरांना आरोग्याचा मोठा धोका निर्माण होऊ शकतो. हा धोका लक्षात घेता जिल्ह्यातील सर्व नियोक्ते, उद्योगपती, बांधकाम कंपन्या तसेच ग्रामपंचायती आणि स्थानिक स्वराज्य संस्थांना आपल्या स्तरावर प्रतिबंधात्मक उपाययोजना करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. कामाच्या ठिकाणी कडक ऊन असताना मजुरांची सुरक्षितता धोक्यात येणार नाही, याची खबरदारी घेण्याच्या सूचना यामध्ये प्रामुख्याने देण्यात आल्या आहेत.

कामगारांच्या सुरक्षिततेसाठी कामाच्या तासांचे फेरनियोजन करणे आता अनिवार्य करण्यात आले आहे. दुपारच्या वेळी जेव्हा उष्णतेची तीव्रता सर्वाधिक असते, तेव्हा काम टाळून कामाचे स्वरूप बदलण्याबाबत सांगण्यात आले आहे. कामगारांना गरजेनुसार विश्रांती देणे, कामाचा वेग कमी करण्यास मुभा देणे तसेच कामाच्या ठिकाणी मुबलक पिण्याचे पाणी आणि सावलीची व्यवस्था करणे बंधनकारक असेल. आपत्कालीन परिस्थिती उद्भवल्यास त्वरित उपचारासाठी बर्फ पॅक आणि उष्णता प्रतिबंधक प्राथमिक उपचार साहित्य उपलब्ध ठेवण्याचे निर्देशही देण्यात आले आहेत.

उन्हाळ्याच्या दिवसात ग्रामीण भागात मोठ्या प्रमाणावर ग्रामयात्रा, धार्मिक आणि सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन केले जाते. अशा ठिकाणी गर्दीमुळे उष्माघाताचा धोका अधिक असतो. त्यामुळे या कार्यक्रमांच्या ठिकाणी आरोग्य कर्मचाऱ्यांची नियुक्ती करणे, आवश्यक औषधसाठा उपलब्ध ठेवणे आणि नागरिकांसाठी थंड पेये व इलेक्ट्रोलाइट्सची सोय करण्याचे आवाहन करण्यात आले आहे. शक्य असल्यास कार्यक्रमांच्या वेळा बदलून त्या सकाळी किंवा सायंकाळी ठेवण्याबाबत विचार करावा, असेही प्रशासनाने सुचवले आहे. जनजागृतीसाठी माहिती फलक आणि पत्रकांचा वापर करून नागरिकांना सतत सावध ठेवण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.

उष्णतेच्या लाटेच्या या संभाव्य संकटात कामगारांचे आरोग्य आणि सुरक्षितता जपण्यासाठी सर्व संबंधित विभाग, उद्योग आणि स्थानिक संस्थांनी समन्वयाने काम करणे गरजेचे आहे. या उपाययोजनांची जिल्ह्यात प्रभावी अंमलबजावणी व्हावी, असे आवाहन निवासी उपजिल्हाधिकारी तथा मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण वैशाली चव्हाण यांनी एका प्रसिद्धीपत्रकाद्वारे केले आहे. नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर कडक लक्ष ठेवले जाईल, असेही प्रशासनाकडून स्पष्ट करण्यात आले आहे.


Protected Content

Play sound