वरणगाव-लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी । भुसावळ नगरपरिषद निवडणूक 2025 च्या पूर्वसंध्येला शहरात निवडणुकीची धामधूम शिगेला पोहोचली आहे. आज, २ डिसेंबर २०२५ रोजी होणाऱ्या मतदानासाठी आवश्यक असलेल्या सर्व साहित्याचे वाटप पूर्ण झाले असून, नियुक्त कर्मचारी आपापल्या केंद्रांकडे रवाना झाले आहेत. प्रशासनाच्या काटेकोर नियोजनामुळे संपूर्ण निवडणूक प्रक्रियेला सुरळीतपणे प्रारंभ झाल्याचे स्पष्ट चित्र दिसत आहे.
मतदानासाठी लागणारी कंट्रोल युनिट, बॅलेट युनिट आणि अन्य साहित्य वेळेवर वितरित व्हावे यासाठी २४ हजेरी टेबल आणि १९ वितरण टेबलांची व्यवस्था करण्यात आली होती. कर्मचारी व अधिकाऱ्यांना योग्य वेळेत साहित्य मिळावे आणि कोणताही विलंब होऊ नये याची विशेष काळजी प्रशासनाने घेतली. निवडणूक प्रक्रियेचे देखरेख कामकाज व्यवस्थित पार पडावे यासाठी २४ सेक्टर ऑफिसर नियुक्त करण्यात आले असून, त्यांच्या प्रवासासाठी २४ एर्टिगा वाहनांची सोय उपलब्ध करून देण्यात आली.

मतदान केंद्रांवर जाणाऱ्या कर्मचाऱ्यांच्या टीम्ससाठी ४५ टेम्पो ट्रॅव्हलर, २४ क्रूझर गाड्या आणि पोलिस विभागासाठी ४ स्वतंत्र वाहनांची व्यवस्था करण्यात आली आहे. या सर्व वाहनांनी सकाळपासूनच मतदार केंद्रांकडे मार्गस्थ होण्यास सुरुवात केली. शहरातील १९१ मतदान केंद्रांवर सुमारे १२०० कर्मचारी आवश्यक साहित्यासह रवाना झाले असून, प्रशासनाने दिलेल्या सूचनांनुसार त्यांनी केंद्रावर पोहोचून तयारीला सुरुवात केली आहे.
भुसावळ शहरातील ४० संवेदनशील मतदान केंद्रांवर अतिरिक्त पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. यासाठी डीवायएसपी संदीप गावीत, बाजारपेठ पोलीस स्टेशनचे राहुल वाघ, तालुका पोलीस स्टेशनचे उद्धव डमाळे तसेच जळगाव येथून आलेले विशेष पथकाची नियुक्ती करण्यात आली आहे. सुरक्षेच्या दृष्टीने संवेदनशील केंद्रांवर कडक देखरेखीची तयारी करण्यात आली असून नागरिकांनी कोणत्याही अफवांवर विश्वास न ठेवण्याचे आवाहन पोलिस प्रशासनाने केले आहे.
निवडणूक निर्णय अधिकारी जितेंद्र पाटील आणि संतोष विनंते यांनी सांगितले की, “प्रशासन पूर्णपणे सज्ज असून निवडणूक शांततेत आणि सुव्यवस्थित पार पडावी यासाठी आवश्यक ती सर्व उपाययोजना करण्यात आल्या आहेत. कर्मचारी व सुरक्षा दलांनी दाखवलेल्या तत्परतेमुळे निवडणुकीची प्रक्रिया विनासायास पूर्ण होईल.”



