

पारोळा – लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी । सेवा पंधरवडा उपक्रमाच्या अंतर्गत सामाजिक उत्तरदायित्वाचे भान राखत महापारेषण १३२ के.व्ही. उपकेंद्राच्या वतीने पारोळा तालुक्यातील मुंदाणे येथील जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शाळेमधील विद्यार्थ्यांना शालेय साहित्याचे वाटप करण्यात आले. या उपक्रमाद्वारे विद्यार्थ्यांमध्ये शिक्षणाविषयी उत्सुकता वाढविण्याबरोबरच स्वच्छतेचे महत्त्व पटवून देण्यात आले.
या कार्यक्रमात मुख्य अतिथी म्हणून १३२ के.व्ही. महापारेषणचे उपकार्यकारी अभियंता योगेंद्र फळक उपस्थित होते. त्यांच्या सोबत दीपक बडगुजर, प्रदीप आर. कुमावत, किरण पाटील, अनिल वाणी, चेतन पाटील, तसेच ग्रामपंचायतीचे सरपंच रोहिदास पाटील, उपसरपंच राजकुमार पाटील, पोलिस पाटील अशोक पाटील आणि शाळेचे मुख्याध्यापक किरण कुलकर्णी सर उपस्थित होते. याशिवाय शिक्षक रेखा कुलकर्णी, मनिषा पाटील, प्रांजली पाटील आणि ग्रामस्थ व विद्यार्थी मोठ्या संख्येने सहभागी झाले.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक मुख्याध्यापक किरण कुलकर्णी यांनी केले. उपकार्यकारी अभियंता योगेंद्र फळक यांनी “स्वतःचा पंधरवडा” या संकल्पनेविषयी विद्यार्थ्यांशी संवाद साधून त्यांना स्वच्छतेचे महत्त्व सांगितले. त्यांनी विद्यार्थ्यांना परिसर स्वच्छ ठेवण्याबाबत जागरूक करून शालेय परिसराची स्वच्छता देखील केली. शाळेतील विद्यार्थ्यांचे कलागुण आणि शिस्तबद्ध वर्तनाचेही त्यांनी कौतुक केले.
यानंतर मान्यवरांच्या हस्ते विद्यार्थ्यांना वह्या, पेन, कंपास बॉक्स यांसारखे शालेय साहित्य वाटप करण्यात आले. हा उपक्रम विद्यार्थ्यांसाठी प्रेरणादायी ठरला असून, त्यांच्यात आत्मविश्वास निर्माण करण्यास मदत झाली आहे. कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन मनोज नेवरे यांनी केले.
या उपक्रमामुळे शाळेतील विद्यार्थ्यांना शिक्षणात खऱ्या अर्थाने बळकटी मिळाली असून, अशा सामाजिक उपक्रमांची सातत्याने गरज असल्याचे ग्रामस्थांचे मत आहे.



