शिक्षण विभागातर्फे प्रत्येक केंद्रावर शालेय पुस्तकांचे वितरण

पुणे-लाईव्ह ट्रेंडस न्यूज वृत्तसेवा | लवकरच शाळेची पहिली घंटा वाजणार आहे. नव्या शैक्षणिक वर्षाची नवलाई विद्यार्थ्यांसह पालकांच्या मनातही असते. ही नवलाईची किनार अधिकच गहरी करण्यासाठी शिक्षण विभाग सज्ज झाला आहे. नवोदितांचे स्वागत, पुस्तक वितरण आदी उपक्रम हाती घेण्यात आले आहेत. शाळेचा पहिला दिवस गोड व्हावा, यासाठी प्रवेशोत्सव होत असतांना सर्व शिक्षा अभियान अंतर्गत विद्यार्थ्यांच्या हातात पुस्तके असतील असा दावा केला जात आहे.

नव्या शैक्षणिक वर्षाचा आरंभ १५ जून रोजी होत आहे. शाळेचा पहिला दिवस विद्यार्थ्यांच्या लक्षात राहण्यासाठी शिक्षण विभाग वेगवेगळ्या माध्यमातून प्रयत्न करत आहे. शाळेच्या पहिल्या दिवशी विद्यार्थ्यांच्या हातात पुस्तक पडावे, यासाठी शिक्षण विभागाकडून सोमवारपासून वेगवेगळ्या केंद्रावर पुस्तक वितरीत होण्यास सुरूवात झाली आहे. याविषयी प्रशासनाधिकारी एन. बी. पाटील यांनी माहिती दिली. शहर परिसरात मराठी, हिंदी, उर्दु, इंग्रजी, गुजराती अशा वेगवेगळ्या माध्यमातील ३०४ शाळांमधील पहिली ते आठवीतील एक लाख, १४ हजार ८९५ विद्यार्थ्यांना सर्व शिक्षा अभियान अंतर्गत पुस्तके वितरीत करण्यात येणार आहेत. कुठलाही विद्यार्थी पुस्तकापासून वंचित राहू नये, यासाठी सोमवारपासून गट केंद्रावर पुस्तकांचे वितरण सुरु करण्यात आल्याचे त्यांनी सांगितले.

दुसरीकडे, गणवेश खरेदीबाबत निविदा पूर्ण केली असली तरी वरिष्ठ पातळीवरून अद्याप याविषयी काहीच सूचना नसल्याचे पाटील यांनी नमूद केले. शाळेचा पहिला दिवस आठवणीत राहण्यासाठी कोणकोणत्या कल्पनांवर काम करता येईल, या अनुषंगाने १२ जून रोजी महाकवी कालिदास कलामंदिरात सर्व मुख्याध्यापकांची बैठक बोलावण्यात आली आहे. यामध्ये वेगवेगळ्या शासकीय योजनांची माहिती देण्यात येणार असून नव्या वर्षाची सुरूवात अभिनव पद्धतीने कशी करता येईल, याविषयी चर्चा करण्यात येणार आहे.

Protected Content