Home Cities अमळनेर अमळनेरात १२३५ जेष्ठ नागरिकांना जीवनोपयोगी साहित्य वाटप

अमळनेरात १२३५ जेष्ठ नागरिकांना जीवनोपयोगी साहित्य वाटप


अमळनेर–लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी । वृद्धांच्या जीवनात आधार ठरणारी राष्ट्रीय वयोश्री योजना म्हणजे केवळ एक शासकीय उपक्रम नसून, ती जेष्ठ नागरिकांच्या आत्मसन्मानाने जगण्याची संधी आहे, असे प्रतिपादन खासदार स्मिता वाघ यांनी केले. अमळनेर तालुक्यात भारत सरकारच्या सामाजिक न्याय व अधिकारता मंत्रालय व ऍलिमको कंपनीच्या संयुक्त विद्यमाने राबविण्यात आलेल्या राष्ट्रीय वयोश्री योजनेअंतर्गत आयोजित साहित्य वाटप कार्यक्रमात त्या बोलत होत्या.

या योजनेअंतर्गत अमळनेर तालुक्यातील १२३५ वृद्ध नागरिकांना सुमारे १ कोटी २० लाख रुपये किमतीचे १५ प्रकारचे जीवनोपयोगी साहित्य मोफत वाटप करण्यात आले. कानासाठी कर्णयंत्र, चालण्यासाठी कृत्रिम पाय, काठी व व्हील चेअर, खाण्यासाठी दात, पाहण्यासाठी चष्मे तसेच कमरेचे पट्टे, गुडघे व शौचासाठी कमोड चेअर अशा विविध साहित्यामुळे वृद्धांच्या दैनंदिन जीवनात मोठा बदल घडणार असल्याचे चित्र दिसून आले.

खासदार स्मिता वाघ पुढे म्हणाल्या की, वृद्धांनाही सार्वजनिक कार्यक्रमात सहभागी व्हावेसे वाटते, गप्पा ऐकायला, विविध पदार्थ खायला आवडतात. त्यांनाही भावना असतात; मात्र वयामुळे दात, कान, हात-पाय कमजोर होतात. त्या कमतरता दूर करून त्यांना स्वाभिमानाने जगता यावे, यासाठी हे प्रयत्न आहेत. वृद्ध माता-पित्यांच्या चेहऱ्यावर दिसणारा आनंद हेच माझ्या कार्याचे खरे सार्थक असल्याची भावना त्यांनी व्यक्त केली.

कार्यक्रमाला प्रमुख अतिथी म्हणून जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी मीनल अग्रवाल, माजी जिल्हा परिषद सदस्य जयश्री पाटील, डॉ. अनिल शिंदे, युवा नेत्या भैरवी पलांडे, भाजपा मंडल अध्यक्ष जिजाबराव पाटील, योगेश महाजन, ॲड. व्ही. आर. पाटील, संदीप पाटील, हिरालाल पाटील, पंचायत समितीचे माजी सभापती श्याम अहिरे, रेखा पाटील, माजी उपनगराध्यक्ष मोहन सातपुते, राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष भागवत पाटील, बीडीओ एन. आर. पाटील, नगरसेविका स्वप्ना पाटील यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.

मुख्य कार्यकारी अधिकारी मीनल करनवाल यांनी सांगितले की, राज्यात वयोश्री योजनेची सुरुवात जळगाव जिल्ह्यातून होत असून खासदार स्मिता वाघ यांच्या विशेष प्रयत्नांमुळे अमळनेर तालुक्यातील मोठ्या संख्येने वृद्ध नागरिकांना या योजनेचा लाभ मिळाला आहे. माजी जिप सदस्य जयश्री पाटील यांनीही युती शासनाच्या या उपक्रमाचे कौतुक करत जेष्ठ नागरिकांना आनंद देणारा हा प्रकल्प असल्याचे नमूद केले.

जिल्हा दिव्यांग पुनर्वसन केंद्राचे प्रमुख एस. पी. गणेशकर यांनी ६० वर्षांवरील नागरिकांना शासनातर्फे दिल्या जाणाऱ्या विविध साहित्याची माहिती देत, या योजनेमुळे वृद्धांच्या जीवनमानात लक्षणीय सुधारणा होईल, असा विश्वास व्यक्त केला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार संजय पाटील यांनी मानले.

यावेळी प्रातिनिधिक स्वरूपात रामेश्वर येथील सुशीलाबाई पाटील, मथुराबाई पाटील, अल्काबाई पाटील, दरेंगावच्या कमलाबाई चव्हाण, कल्पनाबाई जोशी, लोण येथील हरिश्चंद्र पाटील, भीमराव पाटील, बन्सीलाल पाटील, युवराज पाटील व विश्वनाथ पाटील यांना साहित्य वाटप करण्यात आले. कार्यक्रम यशस्वीतेसाठी ऍलिमको कंपनीचे किरण पावरा तसेच दिव्यांग पुनर्वसन केंद्राचे मुकुंद गोसावी, राकेश पाटील, राहुल चौधरी, समाधान पाटील, अमोल पाटील व प्रवीण पाटील यांनी सहकार्य केले.


Protected Content

Play sound