यावल, प्रतिनिधी । आपण ग्रामीण भागातील आहोत असा न्यूनगंड न बाळगता, ध्येय निश्चित करून यशप्राप्ती करिता कठोर परिश्रम घेतले पाहिजे. असे प्रतिपादन नगरसेवक डॉ. कुंदन फेगडे यांनी केले. ते किनगाव येथे विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य व प्रोटीन पावडर वितरणप्रसंगी बोलत होते. भरारी फाऊंडेशन कडून हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता.
किनगाव येथील नेहरू विद्यालयांमध्ये जळगाव येथील भरारी फौंडेशनच्या वतीने विद्यार्थ्यांमध्ये मोफत शैक्षणिक साहित्य व रक्ताची कमी असलेल्या विद्यार्थ्यांमध्ये प्रोटीन पावडरचे वितरण करण्यात आले. कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून माजी महसुलमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांचे स्वीय सहाय्यक तथा भरारी फाऊंडेशनचे अध्यक्ष दीपक परदेशी, किनगाव आरोग्य केंद्राच्या वैद्यकिय अधिकारी डॉ. मनिषा महाजन, नरेंद्र पाटील, मयुर चौधरी, गणेश वराडे, शेखर पटेल, शाळेचे मुख्याध्यापक एस.जी. पाटील, ए.एस. पाटील, सी.के. पाटील आदी मान्यवरांची उपस्थिती होती. या प्रसंगी शाळेतील गोरगरीब ३०० गरजू विद्यार्थ्यांना मान्यवरांच्या हस्ते शालेय साहित्याचे वाटप तसेच ४०० विद्यार्थ्यांना प्रोटीन पावडरचे डबे वाटप करण्यात आले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार प्रदर्शन सी.के. पाटील यांनी केले.