यावल प्रतिनिधी । रावेर तालुक्यातील गारबर्डी येथील आदिवासी पाड्यावर महिला अधिकाऱ्यांच्या पुढाकाराने गोरगरीब आदिवासी बांधवांना दिवाळी फराळ व थंडीच्या बचावा करिता स्वेटर व कपडे वाटप करण्यात आले आहे.
कोरोनाच्या दुसऱ्या लाटेमुळे राज्यासह जिल्ह्यात लॉकडाउनचा आर्थिक फटका सातपुड्याच्या पायथ्याशी असलेले आदिवासी पाडे, तांडे व गावातील हातावर पोट भरणाऱ्या कुटूंबानाही बसलेला आहे. अशातच संचारबंदीच्या कार्यकाळ संपल्यावर दोन वर्षानंतर आलेल्या दिवाळीच्या पार्श्वभूमीवर गोरगरीब आदिवासी बांधवांची दिवाळी गोड व्हावी, या सामाजीक दृष्टीकोणातुन म्हणून तालुक्यातील रहिवासी तथा वागणी जिल्हा ठाणे येथे वैद्यकीय अधिकारी म्हणून कार्यरत असलेल्या डॉ. नसीमा तडवी व बृहन्मुंबई येथे महानगरपालिकेत विधी अधिकारी म्हणून कार्यरत असलेले अँड. तनुजा तडवी या दोघा महिला अधिकाऱ्यांनी दीपावलीनिमित्त अनावश्यक खर्च न करता नेहमीप्रमाणे एक सामाजिक बांधिलकी म्हणून येथून जवळच असलेल्या गारबर्डी ता. रावेर या आदिवासी पाडया ( गावा) वरिल गरीब व गरजू आदीवासी बांधवांना दिवाळीचा फराळ व थंडीच्या बचावा करिता स्वेटर व कपडे वाटप करून दिवाळी हा सण एक वेगळ्या पद्धतीने साजरा केला.
यामुळे तेथील लहान मुलांचे चेहरे आनंदाने फुलले होते. तसेच त्या ठिकाणी तेथील आदिवासी नागरिकांच्या समस्या जाणून घेतल्या नंतर वैद्यकीय अधिकारी डॉ. नसिमा तडवी यांनी कोरोना लसीकरणाचे महत्व पटवून दिले. डॉ. तडवी यानी प्राथमिक आरोग्य केंद्र सावखेडासिम तालुका यावल येथे कार्यरत असतांना अनेक सामाजिक उपक्रम राबविलेले आहेत. या दोघं शासकीय सेवेत कार्यरत असलेल्या महिला अधिकारी शासन सेवेत जबाबदारी, कर्तव्य पार पाडत असताना सामाजिक जबाबदारी ही पार पाडीत आहेत. माणुसकी म्हणुन केलेल्या या त्यांच्या कार्याचे सर्वत्र कौतुक होत आहे.