चोपडा-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । चोपडा तालुक्यातील विरवाडे येथे ट्रॅक्टरमध्ये शेतखत भरण्याच्या कारणावरून झालेल्या वादात एका २३ वर्षीय तरुणाला बेदम मारहाण केल्याची घटना समोर आली आहे. याप्रकरणी चोपडा शहर पोलीस स्थानकात चार जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, कल्पेश एकनाथ गिरासे (वय २३, रा. विरवाडे) हे ६ एप्रिल रोजी सकाळी ९:३० वाजेच्या सुमारास गावातील बसस्थानकाच्या मागील बाजूस असलेल्या प्लॉट भागात होते. यावेळी ट्रॅक्टरमध्ये शेतखत भरण्यावरून आरोपींशी त्यांचा वाद झाला. या वादाचे रूपांतर हाणामारीत झाले.

आरोपी चेतन भोपाल पाटील याने हातातील कड्याने कल्पेश यांच्या डोक्यावर वार करून त्यांना गंभीर जखमी केले. यावेळी उपस्थित असलेले अन्य संशयित आरोपी दर्शन दिनेश पाटील, सुमित संजय पाटील आणि पंकज संजय पाटील यांनी कल्पेश यांना लाथाबुक्क्यांनी मारहाण केली. तसेच संशयित आरोपी कल्पेश यांना ‘जीवे ठार मारण्याची’ धमकीही दिली. याप्रकरणी जखमी कल्पेश गिरासे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून चोपडा शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.



