जळगाव लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । जळगाव शहरातील गिरणा टाकी परिसरात दारू पिण्याच्या जागेवरून झालेल्या वादातून एका तरुणाला दोन जणांनी मारहाण करून जीवे ठार मारण्याची धमकी दिल्याची घटना रविवारी ३१ ऑगस्ट रोजी सायंकाळी ६ वाजता घडली आहे. या गंभीर घटनेनंतर दुसऱ्या दिवशी सोमवारी १ सप्टेंबर रोजी सायंकाळी ५ वाजता रामानंद नगर पोलीस ठाण्यात दोन जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत मिळालेल्या माहितीनुसार, संजोग अशोक पातोडे (वय २७, रा. हरि विठ्ठल नगर) हा तरुण आपल्या कुटुंबीयांसह वास्तव्याला आहे. रविवार, ३१ ऑगस्ट रोजी सायंकाळी ६ वाजता दारू पिण्याच्या जागेवरून वाद झाल्याने संशयित आरोपी रणजितसिंग जीवनसिंग जुन्नी आणि एक अनोळखी व्यक्ती (दोघेही रा. हरि विठ्ठल नगर) यांनी संजोग याला शिवीगाळ केली. त्यानंतर त्याला लोखंडी पाईपने हातावर, पाठीवर आणि पायावर मारून गंभीर दुखापत केली.

या घटनेनंतर जखमी संजोग पातोडे यांनी रामानंद नगर पोलीस ठाण्यात जाऊन फिर्याद दिली. त्यांच्या फिर्यादीवरून पोलिसांनी दोन्ही आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. पोलिसांनी तातडीने तपास सुरू केला असून, आरोपींचा शोध घेत आहेत. या गुन्ह्याचा पुढील तपास पोलीस हेड कॉन्स्टेबल प्रवीण जगदाळे करीत आहेत.



