मुंबई प्रतिनिधी | कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी आज पदाधिकार्यांना जबाबदारीचे वाटप केल्यानंतर अंतर्गत कलह उफाळून आला असून पक्षाचे प्रवक्ते सचिन सावंत यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे. अतुल लोंढे यांना प्रमुख प्रवक्तेपद दिल्याने ते नाराजी असल्याचे समोर आले आहे.
महाराष्ट्र प्रदेश कॉंग्रेस कमिटीचे अध्यक्ष नाना पटोले यांनी नवनियुक्त प्रदेश पदाधिकार्यांना जबाबदार्यांचे वाटप केलं आहे. अतुल लोंढे यांच्याकडे मुख्य प्रवक्तेपदाची व डॉ. सुनिल देशमुख यांच्याकडे आघाडी संघटना, विभाग व सेलची जबाबदारी देण्यात आली आहे. प्रदेश कॉंग्रेसच्या कामात सुसुत्रता व वेग यावा यासाठी प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी विविध समित्यांची रचना करून नवनियुक्त पदाधिकार्यांना जबाबदारीचे वाटप केले आहे.
मात्र नाना पटोले यांनी आपल्या मर्जीतील पदाधिकार्यांना महत्वाच्या जबाबदार्या दिल्याचा आरोप होऊ लागला आहे. यावरच नाराज होऊन कॉंग्रेस अध्यक्ष सचिन सावंत यांनी प्रवक्ते पदाचा राजीनामा दिला आहे. अतुल लोंढे यांना मुख्य प्रवक्तेपद दिल्याने सचिन सावंत यांनी राजीनामा दिल्याची माहिती समोर आली आहे.
सचिन सावंत हे गेल्या दहा वर्षापासून कॉंग्रेसचे प्रवक्ते आहेत. त्यांनी सातत्याने भाजपला अंगावर घेतले होते. कॉंग्रेसची नेमकी भूमिका लोकांपर्यंत पोहोचवण्याचं काम आणि भाजपला सडेतोड उत्तर देण्याचं कामही ते करत होते. शिवाय पक्ष चर्चेत ठेवण्याचंही काम त्यांनी केलं होतं. मात्र, आज झालेल्या नियुक्त्यांमध्ये त्यांना डावलून अतूल लोंढे यांना मुख्य प्रवक्तेपद देण्यात आलं. त्यामुळे सावंत नाराज झाले असून या नाराजीतूनच त्यांनी प्रवक्तेपदाचा राजीनामा दिल्याचं मानले जात आहे. सावंत यांनी त्यांचा राजीनामा कॉंग्रेस हायकमांडला पाठवल्याचं सूत्रांनी सांगितलं.
मध्यंतरी सचिन सावंत यांना राज्यपालांच्या कोट्यातून विधानपरिषदेवर पाठविण्यात येणार असल्याची चर्चा होती. मात्र याबाबत अद्यापही निर्णय झालेला नाही. यातच लोंढे यांना प्रमुख प्रवक्तेपद मिळाल्याने ते नाराज झाल्याने त्यांनी प्रवक्तेपदाचा राजीनामा दिल्यामुळे कॉंग्रेसमधील अंतर्गत कलह समोर आल्याचे दिसून आले आहे.