राज्यपालांशी घटनात्मक तरतुदींबाबत चर्चा करून निर्णय – मुनगंटीवार

4Sudhir Mungantiwar 36

मुंबई, वृत्तसंस्था | भारतीय जनता पक्ष आज सत्ता स्थापनेचा दावा करणार अशी शक्यता व्यक्त होत असताना, ‘आम्ही राज्याला स्थिर सरकार देण्याच्या प्रयत्नात असून आज आम्ही राज्यपाल कोश्यारी यांच्याशी सत्ता स्थापनेच्या घटनात्मक तरतुदींबाबत चर्चा करू आणि त्यानंतरच सरकार स्थापन करायचे की नाही, याचा निर्णय घेऊ’, अशी माहिती भारतीय जनता पक्षाचे नेते सुधीर मुनगंटीवार यांनी दिली आहे.

 

काहीही झाले तरी नवे सरकार हे शिवसेनेला सोबत घेऊनच स्थापन केले जाईल आणि त्याचसाठी आम्ही इतके दिवस थांबलो आहोत, असेही ते यावेळी म्हणाले. राज्यापालांशी चर्चा झाल्यानंतर राज्यात सत्ता स्थापनेबाबत निर्माण झालेली कोंडी फुटण्यास मदत होईल, असा विश्वास मुनगंटीवार यांनी व्यक्त केला आहे.
राज्यातील सत्ता स्थापनेबाबतच्या पेचाबाबत भारतीय जनता पक्षाच्या कोअर कमिटीत जी चर्चा झाली, त्याच चर्चेच्या आधारे आम्ही आज राज्यपाल कोश्यारी यांच्याशी चर्चा करणार असल्याचे मुनगंटीवार म्हणाले. शिवसेनेसोबतच सरकार बनवावे, ही भारतीय जनता पक्षाची इच्छा आहे. अल्पमतातील सरकार भाजप कधीही स्थापन कऱणार नाही. स्थिर सरकार स्थापन करण्यासाठीच भाजपने शिवसेनेची वाट पाहिली आहे, असे सांगत भारतीय जनता पक्ष शिवसेना सोडून इतर कोणत्याही पर्यायाचा विचार करत नसल्याचे ते म्हणाले.

शिवसेनेचे आमदार कधीही फुटणार नाही असे सांगत मुनगंटीवार यांनी शिवसेनेला टोला लगावला आहे. शिवसेनेने आमचे आमदार फोडण्याचा प्रयत्न होत असल्याचे म्हटले आहे. याबाबतच्या प्रश्नावर बोलताना मुनगंटीवार यांनी शिवसेनेचे आमदार अतिशय मजबूत असल्याचे म्हटले आहे. आमदारांचा अशा प्रकारे कुणीही अवमान करणार नाही. जो हजारो, लाखो मतदारांच्या मतदानामुळे निवडून येतो, त्यांच्याविषयी अपशब्द काढणे गैर आहे, आमदार हे आमदार आहेत, त्यांचा सन्मान राखला गेला पाहिजे, असेही मुनगंटीवार म्हणाले. भारतीय जनता पक्ष आणि शिवसेनेचे सर्व आमदार विचाराने पक्के असतात म्हणून कुणी कितीही प्रयत्न केला तर ते फुटू शकणार नाहीत, असेही मुनगंटीवार पुढे म्हणाले.

Protected Content