मुंबई-लाईव्ह ट्रेंड्स न्यूज वृत्तसेवा । राज्याच्या विधान परिषदेत आज एकनाथ खडसे यांच्या अनुपस्थितीवरून राजकीय वातावरण तापले असून, ‘जादूटोणा’ केल्याचा संशय व्यक्त झाल्याने सभागृहात खळबळ उडाली आहे.
अशोक खरात प्रकरणाच्या पार्श्वभूमीवर आधीच मंत्र-तंत्राच्या चर्चांना उधाण आले असताना, आजच्या कामकाजात राष्ट्रवादी शरद पवार गटाचे आमदार शशिकांत शिंदे यांनी खडसे यांच्या अनुपस्थितीवरून खळबळजनक वक्तव्य केले. त्यांनी खडसे सभागृहात येऊ नयेत यासाठी कोणी जादूटोणा केला आहे का, याचा तपास करणार असल्याचे सांगितले, ज्यामुळे चर्चेला वेगळेच वळण मिळाले.

दरम्यान, राज्याचे मंत्री आणि भाजपचे नेते गिरीश महाजन यांनी एकनाथ खडसे यांच्या अनुपस्थितीवर जोरदार टीका करत त्यांच्यावर निशाणा साधला. खडसे हे वारंवार प्रश्न उपस्थित करतात, मात्र सभागृहात उपस्थित राहत नाहीत, अशी टीका महाजन यांनी केली. ते घरातून प्रश्न टाकतात आणि लक्षवेधी सूचना देतात, परंतु त्यावर चर्चा होत असताना सभागृहात हजर राहत नाहीत, असेही त्यांनी नमूद केले.
महाजन यांनी पुढे असा सवाल उपस्थित केला की, खडसे यांच्या लक्षवेधी सूचनांचा वापर कुणावर दबाव टाकण्यासाठी किंवा ब्लॅकमेलिंगसाठी केला जातो का? या वक्तव्यामुळे सभागृहात काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले. दोन्ही नेत्यांमधील जुना राजकीय वाद पुन्हा एकदा उफाळून आल्याचे दिसून आले.
गिरीश महाजन यांच्या टीकेनंतर राष्ट्रवादी शरद पवार गटाचे आमदार शशिकांत शिंदे यांनी खडसे यांचा बचाव केला. त्यांनी सांगितले की, आजच खडसे यांच्याशी फोनवरून संवाद झाला असून त्यांची प्रकृती ठीक नसल्यामुळे ते सभागृहात उपस्थित राहू शकले नाहीत. मात्र, खडसे सतत अनुपस्थित राहावेत किंवा त्यांना अडथळे यावेत यामागे काही वेगळे कारण आहे का, याचा तपास करणे गरजेचे असल्याचे त्यांनी नमूद केले.
शिंदे यांनी ‘जादूटोणा’चा उल्लेख करताच सभागृहात एकच खळबळ उडाली आणि काही काळ चर्चेचा विषय बदलला. या विधानामुळे राजकीय वर्तुळात विविध प्रतिक्रिया उमटू लागल्या आहेत.



