जळगाव-लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी । राज्य शासनाच्या दिव्यांग सक्षमीकरण विभागाच्या आदेशानुसार सुरू करण्यात आलेल्या दिव्यांग प्रमाणपत्र तपासणी मोहिमेत जळगाव जिल्हा परिषदेतील काही कर्मचाऱ्यांच्या दिव्यांग टक्केवारीत तफावत आढळून आल्याने प्रशासनाने कठोर भूमिका घेतली आहे. या प्रकरणात जिल्हा परिषदेच्या आणखी सहा कर्मचाऱ्यांवर निलंबनाची कारवाई करण्यात आली असून, आतापर्यंत निलंबित कर्मचाऱ्यांची संख्या १९ वर पोहोचली आहे.

राज्यातील दिव्यांग कर्मचारी तसेच दिव्यांग व्यक्तींच्या प्रमाणपत्रांची पडताळणी करण्यासाठी राज्य शासनाच्या दिव्यांग कल्याण विभागामार्फत UID कार्ड तपासणी मोहीम राबवली जात आहे. या मोहिमेअंतर्गत जळगाव जिल्हा परिषदेच्या विविध आस्थापनांमध्ये कार्यरत अधिकारी व कर्मचाऱ्यांची तपासणी सुरू आहे. तपासणीदरम्यान काही कर्मचाऱ्यांच्या दिव्यांग प्रमाणपत्रातील टक्केवारी शासनाने निश्चित केलेल्या निकषांशी सुसंगत नसल्याचे निदर्शनास आले आहे.

या गंभीर बाबीची दखल घेत जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी मिनल करनवाल यांनी शुक्रवार, दि. २३ जानेवारी २०२६ रोजी सहा कर्मचाऱ्यांवर निलंबनाची कारवाई केली. याआधीही अशाच स्वरूपाच्या तफावती आढळल्याने १३ कर्मचाऱ्यांवर निलंबनाची कारवाई करण्यात आली होती. त्यात आता नव्याने सहा कर्मचाऱ्यांची भर पडल्याने एकूण १९ कर्मचारी निलंबित झाले आहेत.
निलंबन करण्यात आलेल्या कर्मचाऱ्यांमध्ये राजेश विजय खैरनार, आरोग्य सहाय्यक, तालुका आरोग्य अधिकारी कार्यालय, रावेर; प्रदीप बगडू ढाके, आरोग्य सहाय्यक, प्राथमिक आरोग्य केंद्र सोनवद, ता. धरणगाव; अजय पुंडलिक शिरसाठ, प्राथमिक शिक्षक, आव्हाने शाळा; ज्ञानेश्वर वेडू चौधरी, प्राथमिक शिक्षक, सुनोदा जिल्हा परिषद शाळा; स्वप्नाली वाल्मिक पाटील, प्राथमिक शिक्षक, पथराड, ता. धरणगाव; तसेच पंकजा मगनलाल वाघ, प्राथमिक शिक्षक, जिल्हा परिषद शाळा, नगाव, ता. पारोळा यांचा समावेश आहे.
प्रशासनाकडून स्पष्ट करण्यात आले आहे की, तपासणी मोहिमेदरम्यान ज्या कर्मचाऱ्यांच्या दिव्यांग प्रमाणपत्रात तफावत आढळून येईल, त्यांच्याविरुद्ध शासन नियमांनुसार कठोर कारवाई प्रस्तावित करण्यात येईल. यामुळे जिल्हा परिषद प्रशासनात एकच खळबळ उडाली असून, उर्वरित कर्मचाऱ्यांमध्येही या तपासणीबाबत सतर्कता वाढली आहे.



