जळगाव-लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी । नगरपालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर प्रभाग क्रमांक 10 मध्ये राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार गट) अंतर्गत अंतर्गत मतभेद चव्हाट्यावर आले आहेत. इच्छुक उमेदवार कलाबाई शिरसाठ यांना उमेदवारी न मिळाल्याने त्या भावुक झाल्या असून पक्षातील काही नेत्यांवर थेट आरोप करत त्यांनी आपली नाराजी उघडपणे व्यक्त केली आहे.

माध्यमांशी बोलताना कलाबाई शिरसाठ यांनी कुलभूषण पाटील यांच्यामुळेच आपली उमेदवारी नाकारण्यात आल्याचा आरोप केला. पक्षात प्रामाणिकपणे काम करूनही न्याय मिळत नसल्याची भावना त्यांनी व्यक्त केली. उमेदवारी प्रक्रियेत पारदर्शकता नसल्याचा आरोप करत त्यांनी पक्षाच्या निर्णयप्रक्रियेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले.

आपली कैफियत मांडण्यासाठी लवकरच पक्षाचे प्रभारी संतोष भाऊ चौधरी यांची भेट घेणार असल्याचे शिरसाठ यांनी स्पष्ट केले. पक्ष नेतृत्वाने वस्तुस्थिती समजून घ्यावी आणि अन्याय दूर करावा, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली. तसेच योग्य तो न्याय न मिळाल्यास तीव्र आंदोलनाचा मार्ग अवलंबण्याचा इशाराही त्यांनी दिला.
दरम्यान, एकीकडे उभ्या आघाडीची आणि शरदचंद्र पवार गटाची युती झाली असतानाही कुलभूषण पाटील हे चारही उमेदवार ठरवत असल्याचा थेट आरोप शिरसाठ यांनी केला. स्थानिक पातळीवर निर्णय काही मोजक्या व्यक्तींकडून घेतले जात असल्याने कार्यकर्त्यांमध्ये असंतोष पसरल्याचे चित्र आहे.
या घडामोडींमुळे प्रभाग 10 मधील राजकीय वातावरण तापले असून पक्षांतर्गत समन्वयाचा अभाव समोर येत आहे. वरिष्ठ नेतृत्व या प्रकरणाची दखल घेऊन तोडगा काढते का, याकडे कार्यकर्त्यांचे लक्ष लागले आहे.
एकूणच, उमेदवारीवरून उफाळलेला असंतोष पक्षासाठी आव्हान ठरत असून वेळेत समेट न झाल्यास निवडणुकीत त्याचे पडसाद उमटण्याची शक्यता नाकारता येत नाही.



