Home Cities जळगाव दिव्यांग तपासणी आता आठवडाभर होणार !

दिव्यांग तपासणी आता आठवडाभर होणार !


जळगाव-लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी । जळगाव जिल्ह्यातील दिव्यांग व्यक्तींना दिलासा देणारा महत्त्वाचा निर्णय घेण्यात आला असून, दिव्यांगत्व प्रमाणपत्रासाठी होणारी तपासणी आता केवळ आठवड्यातील एकाच दिवशी न राहता सोमवार ते शुक्रवार दरम्यान करण्यात येणार आहे. त्यामुळे अर्जदारांची गैरसोय मोठ्या प्रमाणात कमी होणार आहे.

यापूर्वी शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय, जळगाव येथील दिव्यांग मंडळामार्फत ही तपासणी दर बुधवारीच केली जात होती. त्यामुळे मोठ्या संख्येने येणाऱ्या अर्जदारांना प्रतीक्षा करावी लागत होती, तसेच काहींना वारंवार चकरा माराव्या लागत होत्या. या पार्श्वभूमीवर प्रशासनाने हा निर्णय बदलत तपासणीची सुविधा आठवडाभर उपलब्ध करून दिली आहे.

अधिष्ठाता डॉ. गिरीष ठाकुर यांनी याबाबत निर्णय घेतला असून, आता संबंधित दिव्यांग व्यक्तींना दिव्यांग विभागाकडून भ्रमणध्वनीवर (SMS) संदेश पाठविण्यात येणार आहे. या संदेशामध्ये नमूद केलेल्या तारखेनुसार अर्जदारांनी उपस्थित राहणे आवश्यक राहणार आहे, ज्यामुळे तपासणी प्रक्रिया अधिक सुलभ व वेळेत पूर्ण होऊ शकणार आहे.

दरम्यान, जिल्ह्यातील सर्व दिव्यांग व्यक्तींनी तपासणीसाठी सोमवार ते शुक्रवार या कालावधीत शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय, जळगाव येथील दिव्यांग मंडळ विभागात उपस्थित राहावे, असे आवाहन अधिष्ठाता डॉ. ठाकुर यांनी केले आहे.

या निर्णयामुळे दिव्यांग नागरिकांना होणारी गैरसोय कमी होऊन त्यांच्या प्रमाणपत्र प्रक्रियेला गती मिळणार असल्याचे स्पष्ट होत आहे.


Protected Content

Play sound