Home प्रशासन नगरपालिका यावलच्या विस्तारित वसाहतीत घाणीचे साम्राज्य ; नागरिकांमध्ये तीव्र संताप  

यावलच्या विस्तारित वसाहतीत घाणीचे साम्राज्य ; नागरिकांमध्ये तीव्र संताप  


यावल-लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी । यावल नगरपालिकेच्या हद्दीतील विस्तारित वसाहतींमध्ये अस्वच्छतेचा प्रश्न गंभीर बनला असून, तुंबलेल्या गटारांमुळे नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे. नगरपालिकेच्या ठेकेदारांच्या मनमानी व निष्काळजी कारभारामुळे विरार नगर, गंगा नगर, कॉलनी परिसर आणि आयसा नगर भागात घाणीचे साम्राज्य पसरले असून, नागरिकांमध्ये तीव्र संताप व्यक्त होत आहे.

या भागांतील गटारे अनेक दिवसांपासून पूर्णपणे तुंबलेली असून सांडपाणी थेट रस्त्यावर साचले आहे. त्यामुळे संपूर्ण परिसरात दुर्गंधीचे वातावरण निर्माण झाले असून डासांचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात वाढला आहे. परिणामी मलेरिया, डेंग्यू, त्वचारोग तसेच इतर संसर्गजन्य आजारांचा धोका वाढल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे.

स्थानिक नागरिकांनी यासंदर्भात वारंवार नगरपालिकेकडे तसेच संबंधित ठेकेदारांकडे तक्रारी करूनही कोणतीही ठोस कार्यवाही करण्यात आलेली नाही, असा आरोप करण्यात येत आहे. नगरपालिकेच्या आरोग्य विभागाकडूनही या गंभीर समस्येकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष होत असल्याचा आरोप नागरिकांकडून केला जात आहे. त्यामुळे प्रशासनाच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे.

या गंभीर परिस्थितीबाबत नागरिकांनी राष्ट्रवादी काँग्रेस (अ.प.) चे यावल शहर कार्याध्यक्ष कदीर खान यांच्याकडे तक्रार दाखल केली आहे. संबंधित ठेकेदारावर तात्काळ कारवाई करून संपूर्ण परिसरातील गटारे त्वरित स्वच्छ करण्यात यावीत, तसेच भविष्यात पुन्हा असा त्रास होऊ नये यासाठी कायमस्वरूपी उपाययोजना राबवाव्यात, अशी ठाम मागणी नागरिकांनी केली आहे.

दरम्यान, नगरपालिकेच्या प्रशासनाने लवकरात लवकर या समस्येची दखल घेतली नाही, तर राष्ट्रवादी काँग्रेस (अ.प.) पक्षाच्या वतीने तीव्र आंदोलन छेडण्यात येईल, असा इशारा कदीर खान यांनी दिला आहे. नागरिकांच्या आरोग्याशी संबंधित प्रश्नांकडे दुर्लक्ष सहन केले जाणार नाही, असा ठाम पवित्राही त्यांनी व्यक्त केला आहे


Protected Content

Play sound