फैजपूर प्रतिनिधी | मसाकाच्या संचालक मंडळाने आपल्या क्षेत्रातील ऊस उत्पादकांना आवाहन करून कळवले आहे की, मधुकर सहकारी साखर कारखाना गेल्या ४२ वर्षांपासून अखंडपणे गाळप करीत आहे मात्र सध्या कारखान्याची आर्थिक परिस्थिती अत्यंत बिकट असल्याने गाळप हंगाम २०१९-२० संचालक मंडळाने बंद ठेवण्याचा निर्णय घेतलेला आहे.
संचालक मंडळाच्या नुकत्याच झालेल्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला आहे. गेल्या वर्षी पाण्याची कमतरता होती, त्यामुळे ऊस लागवड कमी झाली. गाळपासाठी अत्यंत कमी ऊस उपलब्ध असल्याने व मागील वर्षाचे ऊस पेमेंट, ऊस तोडणी वाहतूक पेमेंट, कामगार पगार, पीएफ या व अशा इतर अनेक देणी थकीत झाल्याने यंदाही गाळप हंगाम २०१९-२० संचालक मंडळाने बंद ठेवण्याचा निर्णय घेतलेला आहे. या गाळप हंगामासाठी कारखान्याकडे नोंदणी केलेला संपूर्ण ऊस जवळच्या मुक्ताई शुगर एनर्जी, यांना आपल्या कारखान्याच्या सहकार्याने व त्यांच्या तोडणी वाहतूक यंत्रणेने गाळपासाठी पाठवीत आहोत.
असे संचालक मंडळाने म्हटले आहे.
याशिवाय मधल्या काळात कारखान्याच्या वर नमूद परिस्थितीमुळे ऊस उत्पादकांमध्ये नवा ऊस लागवड करण्याबाबत संभ्रम निर्माण झाला होता, त्यामुळे यंदा ऊस लागवडही अल्पप्रमाणात झालेली आहे. म्हणूनच पुढील वर्षीच्या गाळप हंगाम २०२०-२१ साठी कारखाना सुरू करावयाचे झाल्यास ऊस लागवड होणे, अत्यंत आवश्यक आहे. त्यामुळे संचालक मंडळाने लागवड हंगाम २०१९-२० साठी आतापर्यंत झालेल्या ऊसाची व नवीन ऊस लागवडीची नोंदणी करण्याचे आवाहन चेअरमन शरद महाजन, व्हा चेअरमन भागवत पाटील व सर्व संचालक नरेंद्र नारखेडे, अरुण पाटील, नितिन चौधरी, कार्यकारी संचालक एस.आर. पिसाळ यांनी ऊस उत्पादकांना केले आहे.