जळगाव-लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी । स्थानिक उद्योजकांना थेट ग्राहकांपर्यंत पोहोचण्याची संधी देणाऱ्या ‘अमृतपेठ थेट बाजारपेठ २०२६’ या भव्य प्रदर्शनाचे जळगावात आज दिमाखदार उद्घाटन झाले. महाराष्ट्र संशोधन उन्नती व प्रशिक्षण प्रबोधिनी (अमृत) यांच्या वतीने आयोजित या दोन दिवसीय उद्योजक मेळाव्यामुळे जळगावकरांना उत्पादकांकडून थेट खरेदीची सुवर्णसंधी उपलब्ध झाली आहे.
शहरातील लेवा बोर्डिंग हॉल येथे २१ आणि २२ मार्च रोजी सुरू असलेल्या या प्रदर्शनाचे उद्घाटन महापौर दीपमाला काळे आणि नगरसेविका सुचिता हाडा यांच्या हस्ते दीपप्रज्वलन करून करण्यात आले. यावेळी आयोजक संस्थेचे जिल्हा व्यवस्थापक राजेंद्र कानडे आणि जिल्हा उपव्यवस्थापक दीपक गुप्ता उपस्थित होते. मान्यवरांनी प्रदर्शनातील विविध स्टॉल्सना भेट देत विशेषतः महिला उद्योजकांच्या कौशल्याचे कौतुक केले.

या मेळाव्याचे प्रमुख आकर्षण म्हणजे महिला उद्योजकांनी सादर केलेल्या वैविध्यपूर्ण वस्तू. खाद्यपदार्थांमध्ये घरगुती मसाले, पापड, लोणचे तसेच विविध पारंपरिक पदार्थ उपलब्ध आहेत. वस्त्रप्रावरण विभागात हाताने तयार केलेले आकर्षक कपडे आणि डिझायनर ड्रेसेस ग्राहकांचे लक्ष वेधून घेत आहेत. याशिवाय मण्यांपासून बनवलेले दागिने, सौंदर्यविषयक साहित्य आणि दैनंदिन वापराच्या घरगुती वस्तू एकाच छताखाली उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत.
या प्रदर्शनामुळे उत्पादक आणि ग्राहक यांच्यातील मध्यस्थांची साखळी कमी झाली असून थेट व्यवहाराला चालना मिळाली आहे. आयोजकांच्या मते, यामुळे ग्राहकांना वाजवी दरात दर्जेदार वस्तू मिळत आहेत, तर उद्योजकांना त्यांच्या मेहनतीचा योग्य मोबदला मिळत आहे. स्थानिक उत्पादनांना प्रोत्साहन देत आर्थिक सक्षमीकरणाच्या दिशेने हे प्रदर्शन महत्त्वाचे पाऊल मानले जात आहे.
‘अमृतपेठ’ प्रदर्शन २१ आणि २२ मार्च दरम्यान सकाळी १० ते रात्री ९ या वेळेत सर्व नागरिकांसाठी खुले ठेवण्यात आले आहे. जास्तीत जास्त नागरिकांनी या प्रदर्शनाला भेट देऊन स्थानिक उद्योजकांना प्रोत्साहन द्यावे, असे आवाहन आयोजकांनी केले आहे.



