मुक्ताईनगर-लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी । मुक्ताईनगर तालुक्यातील मौजे सुकळी येथे ग्रामपंचायत ताब्यातील गुरचरण जमिनीवर थेट शाळा उभारण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला असून, खाजगी शिक्षण संस्थेच्या या कथित बेकायदेशीर अतिक्रमणामुळे परिसरात मोठी खळबळ उडाली आहे. कोणतीही शासकीय अथवा प्रशासकीय परवानगी न घेता सार्वजनिक वापरासाठी राखीव असलेल्या जमिनीवर बांधकाम केल्याचा गंभीर आरोप करण्यात आला आहे.

सुकळी ग्रामपंचायतीच्या ताब्यात असलेली गट क्रमांक ११९ मधील अंदाजे पाच हेक्टर क्षेत्रफळाची गुरचरण जमीन ही गावातील जनावरांच्या चाराईसाठी राखीव आहे. मात्र, या जमिनीवर टाकळी (ता. मुक्ताईनगर) येथील रामदेव बाबा बहुउद्देशीय शिक्षण संस्थेने थेट शाळेची उभारणी केल्याचे आरोप समाजसेवक शिवाजी वानखेडे यांनी केले आहेत. या बांधकामासाठी ग्रामपंचायत, महसूल विभाग किंवा इतर कोणत्याही सक्षम प्राधिकरणाची परवानगी घेतली नसल्याचे तक्रारीत नमूद करण्यात आले आहे.

या प्रकरणी वानखेडे यांनी यापूर्वी अनेक वेळा ग्रामपंचायत व ग्रामप्रशासनाकडे लेखी व तोंडी तक्रारी केल्या होत्या. मात्र, सातत्याने दुर्लक्ष झाल्याचा आरोप करत त्यांनी अखेर मुक्ताईनगरचे तहसीलदार व गटविकास अधिकारी यांच्याकडे सविस्तर लेखी तक्रार दाखल केली आहे. सार्वजनिक मालमत्तेवर झालेले अतिक्रमण तात्काळ हटवावे व संबंधितांवर कायदेशीर कारवाई करावी, अशी मागणी त्यांनी केली आहे.
तक्रारीनुसार, सदर गुरचरण जमीन सन १९५६–५७ मध्ये जिल्हाधिकाऱ्यांनी अटी व शर्तींसह ग्रामपंचायत सुकळी यांच्या ताब्यात दिलेली आहे. या जमिनीचा वापर बदलण्यास स्पष्ट मनाई असताना, नियम धाब्यावर बसवून शिक्षण संस्थेने बांधकाम केल्याचा आरोप आहे. यामुळे गावातील पशुपालकांमध्ये नाराजी व्यक्त होत असून, चाराईचा प्रश्न गंभीर बनला आहे.
या संपूर्ण प्रकरणाला राजकीय रंग असल्याचा आरोपही करण्यात येत आहे. संबंधित शाळेतील एक शिक्षक हा ग्रामपंचायत सदस्य असून राजकारणात सक्रिय असल्यामुळेच प्रशासन कारवाई करत नसल्याचा गंभीर आरोप शिवाजी वानखेडे यांनी केला आहे. त्यामुळे प्रशासनाची भूमिका संशयाच्या भोवऱ्यात सापडली असून, ‘सर्वांसाठी कायदा समान आहे का?’ असा सवाल उपस्थित केला जात आहे.
तहसीलदारांकडे तक्रार दाखल झाल्यानंतर प्रशासन नेमकी कोणती भूमिका घेणार, बेकायदेशीर शाळेवर कारवाई होणार की राजकीय दबावाखाली हे प्रकरण दडपले जाणार, याकडे आता संपूर्ण तालुक्याचे लक्ष लागले आहे.



