जामनेर-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष तथा मराठा समाजातील मातब्बर व्यक्तीमत्व मानले जाणारे दिलीप खोडपे यांनी भाजपच्या सदस्यत्वाचा राजीनामा दिला असून ते तुतारी हातात घेऊन ना. गिरीश महाजन यांना आव्हान देण्याची शक्यता आहे.
राज्याचे ग्रामविकास मंत्री ना. गिरीश महाजन यांच्या जामनेर मतदारसंघात त्यांना कुणाचेही आव्हान नसल्याचे चित्र होते. कारण काही महिन्यांपूवत महाजन यांचे कट्टर विरोधक संजय गरूड यांनी भाजपमध्ये प्रवेश केल्यामुळे महाजन यांचा एकतर्फी विजय होईल असे सर्वांचे मत होते. मध्यंतरीच्या काळात मराठा योध्दा मनोज जरांगे पाटील यांनी गिरीश महाजन यांना जामनेरातून पाडणार असल्याची गर्जना केल्याने राजकीय वर्तुळात चर्चा सुरू झाली होती. यातच आता गिरीश महाजन यांच्या समोर मराठा समाजातील एक मोठे व्यक्तीमत्व उभे ठाकण्याचे संकेत मिळाले आहेत.
जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष दिलीप खोडपे यांनी आज आपल्या भारतीय जनता पक्षाच्या सदस्यत्वाचा राजीनामा दिला असून तेच गिरीश महाजन यांना आव्हान देतील अशी माहिती समोर आली आहे. सूत्रांच्या माहितीनुसार दिलीप खोडपे हे शरद पवार गटात सहभागी होऊन आगामी विधानसभा निवडणूक लढवतील अशी शक्यता आहे. यामुळे गिरीश महाजन यांच्या समोर विधानसभा निवडणुकीत मोठे आव्हान उभे राहण्याची शक्यता आहे.