Home राजकीय मुंबईत मिळकतीच्या फेरफार प्रक्रियेला डिजिटल गती

मुंबईत मिळकतीच्या फेरफार प्रक्रियेला डिजिटल गती


मुंबई-वृत्तसेवा | मुंबई शहर जिल्ह्यातील मिळकतीच्या फेरफार प्रक्रियेला आता डिजिटल स्वरूप मिळाले असून नागरिकांसाठी ही मोठी दिलासादायक बाब ठरली आहे. महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी विधानसभेत यासंदर्भात माहिती देताना, या नव्या ऑनलाईन प्रणालीमुळे मुंबईतील सुमारे ३० लाख नागरिकांना थेट लाभ होणार असल्याचे सांगितले.

मुंबई शहरात प्रथमच मिळकतीचे फेरफार (म्युटेशन) ऑनलाईन पद्धतीने सुरू करण्यात आले असून, यामुळे नागरिकांना सरकारी कार्यालयांचे फेरे मारण्याची गरज मोठ्या प्रमाणात कमी होणार आहे. यापूर्वी मुंबई शहर आणि राज्यातील इतर भागांमध्ये प्रॉपर्टी कार्ड संगणकीकरणाच्या वेगवेगळ्या प्रणालींमुळे अनेक तांत्रिक अडचणी निर्माण होत होत्या. मात्र, वाढती मागणी लक्षात घेऊन शासनाने या प्रक्रियेला गती देत स्वतंत्र ऑनलाईन प्रणाली विकसित केली आहे.

या नव्या प्रणालीअंतर्गत मुंबई शहर जिल्ह्यातील १९ महसूल विभाग आणि ४ नगर रचना योजनांमधील सुमारे २७,८४७ मिळकती पत्रिका https://mahabhumi.gov.in/ या संकेतस्थळावर तसेच जिल्हाधिकारी कार्यालयाच्या संकेतस्थळावर उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. नागरिकांना आता घरबसल्या फेरफारासाठी अर्ज करता येणार असून अर्जाची स्थितीही ऑनलाईन तपासता येणार आहे.

विशेष म्हणजे, या उपक्रमांतर्गत तब्बल ४५ प्रकारच्या फेरफारांसाठी ऑनलाईन अर्जाची सुविधा देण्यात आली आहे. यामध्ये खरेदीखत, वारसा, बक्षीसपत्र, भाडेपट्टा, गहाणखत, रोड सेटबॅक, आरक्षण आणि भूसंपादन यांसारख्या विविध बाबींचा समावेश आहे.

मुंबई शहर जिल्हाधिकारी कार्यालयासाठी विकसित करण्यात आलेल्या या उपक्रमामुळे पारदर्शकता वाढणार असून कामकाज अधिक वेगवान आणि सुलभ होणार आहे. या उपक्रमाच्या यशस्वी अंमलबजावणीबद्दल मंत्री बावनकुळे यांनी मुंबईच्या जिल्हाधिकारी आंचल गोयल यांचे विशेष अभिनंदन केले.


Protected Content

Play sound